आज चॉकलेट डे; वाढवा नात्यात प्रेमाचा गोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 09:50 IST2018-02-09T09:50:23+5:302018-02-09T09:50:52+5:30
चॉकलेट, आकाराने तशी खूप लहान गोष्ट. पण, त्याच्या साखरपेरणीने गोड झालेल्या नात्यातील गोडवा चिरंतन असतो.

आज चॉकलेट डे; वाढवा नात्यात प्रेमाचा गोडवा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चॉकलेट, आकाराने तशी खूप लहान गोष्ट. पण, त्याच्या साखरपेरणीने गोड झालेल्या नात्यातील गोडवा चिरंतन असतो. कारण, या चॉकलेटच्या देवाण-घेवाणीत त्याचा आकार व दर्जा नाही तर भावना महत्त्वाच्या असतात. चॉकलेटला बोलता येत नाही.
शब्द, भाषा कळत नाही. पण, त्याच्या देण्याघेण्यात एक समग्र संहिता असते प्रेमाची. जी उर्वरित जगाला वाचता येत नाही. प्रेमवीर मात्र वाचून घेतात चॉकलेटवर कोरलेल्या अदृश्य भावनांचा शब्द नि शब्द. म्हणूनच व्हॅलेंटाईन वीकचा हा तिसरा दिवस आपल्या जिवलगाला चॉकलेट देऊन जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मग? तुम्ही केलीय न तयारी? कुठले चॉकलेट देणार काही कळत नाहीये. हरकत नाही, आम्ही आहोत ना. तुमच्या नात्यातील गोडवा आणखी वृद्धिंगत करण्यासाठी वाचा या खालील टीप्स....
कुठले चॉकलेट देणार?
चॉकलेट केक हा मस्त पर्याय आहे. शिवाय तो आॅर्डर देऊनही बनवता येऊ शकतो. त्याला आणखी आकर्षक करण्यासाठी हृदयाचा आकार देता येईल. यावर क्रीमने आपल्या आवडत्या व्यक्तीचे नाव लिहिले तर हा दिवस अविस्मरणीय होऊन जाईल. चॉकलेट कुकीज, चॉकलेट फाऊंटेन, चॉकलेट पेस्ट्री, चॉकलेट आईसक्रीम याची गोड झालर या केकला लावता येऊ शकेल.
आज एक आणखी विशेष करता येईल. तुम्ही आपल्या जिवलगाला चॉकलेट घेऊन भेटायला जाताना चॉकलेटी रंगाचा ड्रेस घाला. हे सरप्राईज तुमच्या जोडीदाराला सुखावणारे असेल.
तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या आरोग्याची विशेष काळजी असेल तर ड्रायफ्रूट चॉकलेट हा उत्तम पर्याय आहे. शिवाय यात व्हेरायटीही खूप आहेत.