चिमुकली जान्हवी पाहणार सुंदर जग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2015 02:58 IST2015-07-12T02:58:15+5:302015-07-12T02:58:15+5:30

अवघी पाच महिन्यांची असताना चिमुकल्या जान्हवीच्या डोळ्यांंना कांजण्या झाल्या. उपचार करताना डॉक्टरांना डोळ्याचा कॅन्सर असल्याचे लक्षात आले.

Chimukuli janhavi beautiful world! | चिमुकली जान्हवी पाहणार सुंदर जग!

चिमुकली जान्हवी पाहणार सुंदर जग!

मारुती जवंजार यांचा पुढाकार : लोकमतच्या आवाहनाने उपचाराचा खर्च मिळणार
नागपूर : अवघी पाच महिन्यांची असताना चिमुकल्या जान्हवीच्या डोळ्यांंना कांजण्या झाल्या. उपचार करताना डॉक्टरांना डोळ्याचा कॅन्सर असल्याचे लक्षात आले. त्यात डावा डोळा काढण्यात आला आणि आता उजव्या डोळ्यालाही कॅन्सरने विळखा घातला. जान्हवी आता दोन वर्षांची आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या तिच्या मायबापाचे यामुळे अवसान गळाले. पुढच्या उपचारासाठी पैसेही नाही.
आपल्या पोटच्या गोळ्याचा डोळा वाचावा म्हणून त्यांनी लोकमतकडे धाव घेतली आणि बेरार फायनान्स लि.चे चेअरमन मारुती जवंजार देवदूतासारखे धावून आले. चिमुकल्या जान्हवीच्या उपचाराचा दोन लाख रुपयांचा खर्च करण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. जान्हवी २१ जुलैला हैद्राबादला जाणार आहे. जवंजार यांचा मुलगा संदीप यांनी हैद्राबाद येथील संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधून तेथील उपचार आणि गरज पडल्यास शस्त्रक्रियेच्या खर्चाचीही तरतुद केली आहे.
शालू आणि प्रदीप घोडेले यांची जान्हवी मुलगी आहे. प्रदीप घोडेले पुजारी आहेत. जेमतेम चरितार्थ चालविण्यापुरती त्यांची मिळकत आहे. मुलीला डोळ्याचा कॅन्सर निघाल्यावर तिला वाचविण्यासाठी सारी ताकद खर्च झाली. तिच्या एका डोळ्यात १० एमएमची तर दुसऱ्या डोळ्यात ३ एमएमची गाठ डॉक्टरांना आढळली. त्यात जान्हवीचा एक डोळाही काढण्यात आला. शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी रेडिएशन व किमोथेरपीच्या उपचाराने तिच्या दुसऱ्या डोळ्यातील गाठ काढण्याचाही प्रयत्न केला. पण त्यात अपयश आल्याने डॉक्टरांनी हैदराबाद येथील ‘सेंटर फॉर साईट’ या अत्याधुनिक रुग्णालयात त्यांना उपचारार्थ पाठविले. पण तेथेही कॅन्सरची गाठ कमी झाली नाही. कॅन्सर मेंदूपर्यंत पोहोचू नये म्हणून जान्हवीचा डावा डोळा काढण्यात आला. यात सारा पैसा संपला. पण जान्हवीच्या दुसऱ्या डोळ्यालाही कॅन्सरने ग्रासले. तिच्यावर अत्याधुनिक उपचार केल्यास तिचा उजवा डोळा वाचू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. पण त्यासाठी किमान दोन लाखांचा खर्च लागणार असल्याने घोडेले कुटुंब चिंतित होते. लोकमतने पुढाकार घेऊन मदतीचे आवाहन केले आणि मारुती जवंजार यांनी उपचाराचा सारा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली.
चिमुकली पाहणार सुंदर जग!
नागपूर : लोकमतमधील वृत्त वाचून संवेदनशील मारुती जवंजार अस्वस्थ झाले. त्यांनी घोडेले यांचे निवासस्थान शोधले आणि जान्हवीच्या वडिलांना उपचाराचा सारा खर्च देऊ केला. त्यांच्यामुळे जान्हवीच्या मायबापाला देवदूतच लाभला. पैशांअभावी जान्हवीचे उपचार आता थांबणार नाहीत आणि चिमुकली जान्हवी पुन्हा हे सुंदर जग अनुभवू शकेल, पाहू शकेल. जान्हवी आणि तिचे आई-वडील आता नव्याने जगू शकणार आहेत आणि जान्हवीचा डोळा वाचवू शकणार आहेत.(प्रतिनिधी)
मारुती जवंजार यांचे कार्य प्रेरणादायी
बेरार फायनान्सचे लि.चे चेअरमन असलेले मारुती जवंजार यांचे कार्य प्रेरणादायी आहे. ते सातत्याने समाजातील अनेक संस्थांना मदत करीत असतात पण त्याची गुप्तता पाळतात. सत्पात्री दान देत राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्याची प्रसिद्धी केलेली त्यांना आवडत नाही. त्यांचा हाच वारसा त्यांचा मुलगा संदीपही सांभाळतो आहे. तो संस्थेचा कार्यकारी संचालक आहे. घोडेले कुटुंबाला जान्हवीच्या उपचारासाठीही त्यांनी अलिप्तपणे मदत करण्याचा निर्णय घेतला पण लोकमतच्या विनंतीखातर त्यांनी लोकमत कार्यालयाला भेट देऊन जान्हवीच्या प्रथम पातळीवरील उपचारासाठीचा धनादेश दिला. याशिवाय हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पासह अनेक संस्थांना ते यथाशक्ती मदत करीत असतात. त्यांच्या या मदतीने जान्हवीच्या उपचाराची फरफट थांबली आहे. याचे समाधान तिच्या आई- वडिलांच्या डोळ्यात जाणवले.

Web Title: Chimukuli janhavi beautiful world!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.