बोअरवेलच्या खड्ड्यात पडला चिमुकला

By Admin | Updated: April 7, 2017 03:03 IST2017-04-07T03:03:09+5:302017-04-07T03:03:09+5:30

बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या पावणदोन वर्षांच्या चिमुकल्याला कळमना पोलिसांनी अवघ्या ५५ मिनिटात सुखरूप बाहेर काढले.

Chimukala fell into the borewell pothole | बोअरवेलच्या खड्ड्यात पडला चिमुकला

बोअरवेलच्या खड्ड्यात पडला चिमुकला

प्रथमेश सुखरूप : ५५ मिनिटात काढले बाहेर
नागपूर : बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या पावणदोन वर्षांच्या चिमुकल्याला कळमना पोलिसांनी अवघ्या ५५ मिनिटात सुखरूप बाहेर काढले. प्रथमेश दीपक गजभिये असे या चिमुकल्याचे नाव असून, खबरदारीचा उपाय म्हणून त्याला डॉक्टरांनी आपल्या निगराणीत ठेवले आहे.
कळमना भांडेवाडीतील एकतानगरात गजभिये परिवार राहतो. दीपक गजभिये खासगी वाहनचालक असून, प्रथमेशची आई गृहिणी आहे. त्यांच्या घराजवळ काही दिवसांपूर्वी बोअरवेलचा खड्डा खोदण्यात आला. खड्डा करणाऱ्याने निष्काळजीपणाचा कळस गाठून त्याचे तोंड तसेच उघडे ठेवले.
चिमुकला प्रथमेश घराजवळ खेळता खेळता गुरुवारी सायंकाळी बोअरवेलच्या खड्ड्यात पडला. दरम्यान, बराच वेळेपासून प्रथमेश नजरेस न पडल्याने अस्वस्थ झालेल्या त्याच्या आईने त्याला आवाज देत इकडे तिकडे शोघ घेतला. आईचा आवाज ऐकू आल्याने प्र्रथमेशही रडू लागला.
बोअरवेलच्या खड्ड्यातून रडणे ऐकू येत असल्यामुळे आईने मदतीसाठी आरडाओरड केली. अल्पावधीतच बोअरवेल शेजारी बघ्यांची तोबा गर्दी उसळली. दरम्यान, गर्दीतील एकाने नियंत्रण कक्षाला फोन करून ही माहिती दिली. नियंत्रण कक्षाने ५.४५ वाजता कळमना पोलिसांना घटनेची माहिती कळवली. ती कळताच ठाणेदार सुनील बोंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह लगेच घटनास्थळी धाव घेतली.
... अन् सुरू झाले बचाव कार्य
घटनास्थळी अंधार असूनही बघ्यांची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे हवा मिळणार नाही, परिणामी आतमधील चिमुकल्याच्या जीवाला धोका होऊ शकतो, हे ध्यानात घेऊन पोलिसांनी गर्दीतील लोकांना बाजूला सारले. शेजाऱ्यांकडून तातडीने वायर, लाईट आणि पंखे बोलवून आतमध्ये उजेड पडेल तसेच हवा जाईल अशी व्यवस्था केली. त्यानंतर प्रथमेशच्या आईला खड्ड्याजवळ बसवून प्रथमेशने निरंतर बोलावे, अशी व्यवस्था केली. दरम्यानच्या वेळेत प्रथमेश ८ ते १० फूट अंतरावर अडकल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे पोलिसांनी जेसीबी बोलवून बोअरवेलला समांतर खड्डा केला. १० ते १२ फुटानंतर दोन्ही खड्ड्यांच्या मध्ये एक खिडकी करून प्रथमेशला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
पोलीस बनले देवदूत
पोलिसांनी बाहेर काढलेला आणि चिखलमातीने भरलेला प्रथमेश सुखरूप असल्याचे कळताच हजारोच्या गर्दीने आनंदाने एकच गलका केला. पोलिसांनी लगेच त्याला बाजूच्या डॉ. कुबडे यांच्या चाईल्ड केअर सेंटरमध्ये नेले. त्याला तपासल्यानंतर तो सुखरूप असल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी नोंदविला. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्याला डॉक्टरांनी आपल्या निगराणीत ठेवून घेतले. प्रथमेशला सुखरूप बाहेर काढणारे कळमन्याचे ठाणेदार सुनील बोंडे तसेच अरुण दामोदर भोयर, आशिष मोरेश्वरराव खानोरकर, अजय जयराजसिंग ठाकूर, विनोद नारायणराव कोल्हे, राजेंद्र भगवानजी वासाडे, सूर्यकांत सुभाषचंद्र तिवारी तसेच एस. आय. उईके हे देवदूत ठरले आहेत. त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रिन्सचा अनुभव कामी आला
अशा बचाव कार्याचे पोलिसांना कसलेही प्रशिक्षण नसते. मात्र, काही वर्षांपूर्वी प्रिन्स नामक बालक अशाच प्रकारे बोअरवेलच्या खड्ड्यात पडला होता. त्यावेळी सैन्यदलाने बचावकार्य करून प्रिन्सला बाहेर काढले होते. वृत्तवाहिन्यांवरून हे सर्व आम्ही बघितले होते. तेच टीव्ही बघणे प्रथमेशला बाहेर काढण्यासाठी कामी आले, अशी प्रतिक्रिया यावेळी ठाणेदार बोंडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.(प्रतिनिधी)

Web Title: Chimukala fell into the borewell pothole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.