आईवडिलांच्या डोळ्यादेखतच गेला मुलाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:20 IST2021-02-20T04:20:25+5:302021-02-20T04:20:25+5:30

भिवापूर/उमरेड : सकाळपासूनच शेतात पाच-सहा शेतमजूर हरभरा कापणीला होते. आपल्या आईवडिलांसह दोन मुलेही सोबतीला असताना अचानक विजांचा कडकडाट सुरू ...

The child's life passed before the eyes of the parents | आईवडिलांच्या डोळ्यादेखतच गेला मुलाचा जीव

आईवडिलांच्या डोळ्यादेखतच गेला मुलाचा जीव

भिवापूर/उमरेड : सकाळपासूनच शेतात पाच-सहा शेतमजूर हरभरा कापणीला होते. आपल्या आईवडिलांसह दोन मुलेही सोबतीला असताना अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. वाऱ्यासह पावसाचेही आगमन झाले. शेतातील सारेच आडोशाला गेले. ढीग लावलेल्या हरभऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून दोन्ही भावंडे ताडपत्री घेऊन त्या ढिगाऱ्याजवळ लगबगीने पोहोचली. क्षणभरातच वीज गरजली. अवघ्या सेकंदात एका तरुण शेतकऱ्यावरच वीज कोसळली. ‘पोरांनो, जरा सांभाळून पाऊस सुरू आहे. विजेचा काही भरवसा नाही हेच शब्द कुणाच्या मनात तर कुणाच्या तोंडावाटे बाहेर पडत नाहीत तोच आई-वडिलांच्या डोळ्यादेखतच पोराचा जीव गेला. उमरेडनजीक असलेल्या पांढराबोडी (ता. भिवापूर) येथे ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी घडली. सचिन रामाजी सहारे (३५) असे वीज कोसळून ठार झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. यामध्ये त्याचा लहान भाऊ अरविंद सहारे हा थोडक्यात बचावला. पांढराबोडी येथील सचिन सहारे याच्याकडे अडीच एकर शेती आहे. याशिवाय सचिन उमरेड येथे शिकवणी वर्ग चालवायचा. कोरोनाच्या काळात त्याने शेतीकडे लक्ष देण्याचे निश्चित केले. काही दिवसांपूर्वी थोड्याफार हरभऱ्याची कापणी झाली होती. अशातच आज उर्वरित कापणी आणि वेचणी यासाठी सचिन त्याचा भाऊ अरविंद, वडील रामाजी, आई नत्थाबाई शेतमजुरांसमवेत शेतात होते. अशातच विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. ढीग लावलेल्या हरभऱ्याची पावसापासून बचाव करण्यासाठी सचिन आणि अरविंद दोघेही ताडपत्री घेऊन धावले. अशातच वीज कोसळली आणि यात सचिन जागीच ठार झाला. काही फुटांच्या अंतरावर असलेला अरविंद यात थोडक्यात बचावला. उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात सचिनचे शवविच्छेदन करण्यात आले. सचिनचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याला एक वर्षाची मुलगीसुद्धा आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पाऊस अन् अश्रुधारा

अगदी काही क्षणापूर्वी आनंदाने कापणी सुरू असलेल्या शेतात वीज कोसळताच आणि जीव जाताच सन्नाटा पसरला होता. इकडे पाऊस आणि साऱ्यांच्या डोळ्यात अश्रुधारा! तिकडे विजांचा कडकडाट आणि इकडे आईवडिलांनी हंबरडा फोडल्याचे दु:ख साऱ्यांसाठीच डोंगराएवढे झाले होते.

Web Title: The child's life passed before the eyes of the parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.