स्टोव्हची टाकी फुटल्यामुळे बालकाचा मृत्यू
By Admin | Updated: June 22, 2017 02:08 IST2017-06-22T02:08:31+5:302017-06-22T02:08:31+5:30
स्टोव्हची टाकी फुटल्यामुळे आगीत भाजलेल्या दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून त्याचे आई-वडील, बहिणीसह पाच जण जखमी झाले आहेत.

स्टोव्हची टाकी फुटल्यामुळे बालकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्टोव्हची टाकी फुटल्यामुळे आगीत भाजलेल्या दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून त्याचे आई-वडील, बहिणीसह पाच जण जखमी झाले आहेत.
ताजाबाद येथील निराला सोसायटीत किरायाने राहणारे शकील शेख हे भंगाराचा व्यवसाय करतात. ते वस्तीत फिरून भंगार गोळा करतात. शकीलने आठवडाभरापूर्वी भंगारात चार चाकी वाहनात वापरण्यात येणारे सिलींडर विकत घेतले. सिलिंडरच्या आतील भागात पितळ असते. १६ जूनला खोलीच्या समोर २० फुटावर शकील, त्याचा भाचा आणि जावई हे सिलिंडरमधील पितळ काढत होते. शकीलची पत्नी स्टोव्हवर चहा बनविण्यासाठी घरात आली. तिने स्टोव्ह पेटविताच स्टोव्हची टाकी फुटून जोराचा आवाज झाला आणि आग लागली.यात शकीलची पत्नी आणि जवळच झोपलेला दोन वर्षाचा मुलगा रशीद, पाच वर्षाची मुलगी अफरोज भाजले. आगीमुळे सिलिंडरच्या जवळ बसलेला शकील, त्याचा भाचा आणि जावई यांनाही आगीचा फटका बसला. जोरात आवाज झाल्यामुळे शेजारीही मदतीसाठी धावले. त्यांनी सर्वांना उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले. शकीलचा मुलगा आणि मुलगी सोडून इतरांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उपचारादरम्यान मंगळवारी शकीलचा मुलगा रशीदला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.