मुलेच मुले, हाती फुलेच फुले
By Admin | Updated: June 27, 2014 00:43 IST2014-06-27T00:43:45+5:302014-06-27T00:43:45+5:30
आईला सोडून वर्गात जाणे, शाळेत स्वतंत्रपणे जाणे चिमुकल्यांच्या छोट्याशा भावविश्वाला हादरा देणारे होते. त्यामुळे अनेक मातांना गहिवरून आले. पोरांचा आकांत त्यांना अस्वस्थ करणारा होता

मुलेच मुले, हाती फुलेच फुले
नागपूर : आईला सोडून वर्गात जाणे, शाळेत स्वतंत्रपणे जाणे चिमुकल्यांच्या छोट्याशा भावविश्वाला हादरा देणारे होते. त्यामुळे अनेक मातांना गहिवरून आले. पोरांचा आकांत त्यांना अस्वस्थ करणारा होता पण शाळेत तर जायलाच हवे. मुलांना शाळेची शिस्त लागावी म्हणून मातांनीही कठोरतेने त्यांचा हात सोडला. पण मुले शाळेत असेपर्यंत अनेक पालक शाळेबाहेर उभे होते. आज पहिलाच दिवस असल्याने लहान मुलांची शाळा १ तासाचीच ठेवण्यात आली होती.
मुले वर्गात आलीत पण ती सतत रडत असल्याने शिक्षकांचीही त्रेधातिरपीट झाली. त्यामुळे अनेक शाळांमध्ये प्रथमच येणाऱ्या चिमुकल्यांना सांभाळण्यासाठी चार ते पाच शिक्षकांची व्यवस्था केली होती. शिक्षकांनी मुलांच्या भावविश्वातल्या गोष्टी सांगून, खाऊ देऊन त्यांना सांभाळले. शाळा सुटल्यावर पालक शाळेबाहेर भेटल्याने मुलेही सुखावली.
शाळेच्या पहिल्या दिवसाचे महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळेच असते. आई-वडिलांच्या जिव्हाळ्याचा हात सोडून जगाच्या स्पर्धेला तोंड देण्याचा श्रीगणेशा याच दिवसाने होतो. आयुष्यभर पुरणाऱ्या अनुभवांची शिदोरी येथूनच मिळू लागते. दोन महिने शांत असलेल्या शाळांमध्ये बच्चे कंपनीचा चिवचिवाट आज पुन्हा अनुभवायला मिळाला.
नवा युनिफॉर्म, नवी पुस्तके, नवे सवंगडी... त्यांच्याशी बोलण्याचा उत्साह, शिक्षकांनी केलेल्या स्वागताची जोड अशा वातावरणात आज शाळांमधील पहिला दिवस पार पडला. अनुदानित शाळांमध्ये तर पुस्तकांचे वाटप करण्यात आले. अनेक शाळांमध्ये पहिल्या दिवशी अभ्यासाची बाराखडी न गिरवता मुलांना आवडणारे खेळ, गाणी यांचा उपयोग करण्यात आला. आज पहिलाच दिवस असल्याने काही विद्यार्थी रंगीबेरंगी कपड्यातच आले होते. अनेक पालकांनी अद्याप गणवेश घेतलेला नाही. पहिलाच दिवस असल्याने चिमुकले फक्त टिफीन घेऊन गेले. आज दप्तराला सुटी मिळाली होती. पुढचे काही दिवस शाळा कमी वेळात आटोपणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेची सवय लागावी. हा त्यामागचा उद्देश आहे.
शासकीय निर्देशांप्रमाणे शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. विद्यार्थी चकचकीत युनिफॉर्म्स व नवीन साहित्यासह आॅटो, रिक्षा, सायकल यातून शाळेत पोहोचले. सकाळच्या वेळेस शाळांची प्रार्थना सुरू झाल्यावर वातावरण प्रसन्न झाले होते. काही शाळांनी सामाजिक संदेश देत प्रभातफेरी काढली. कुठे शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. शिक्षक व मुख्याध्यापकांनी मुलांना शिस्तीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.
सामाजिक संदेश
नागपूर विभागातील काही शाळांमध्ये मुलांना तंबाखू न खाण्याची शपथ देण्यात आली व तंबाखूपासून होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. याशिवाय सामाजिक एकता, प्रदूषण, सार्वजनिक स्वच्छता या विषयांवरदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
शाळांचे शिस्तीला महत्त्व
पश्चिम नागपुरातील अनेक शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सोडायला पालकांची गर्दी झाली होती. अनेक विद्यार्थ्यांना पालकांचा हात सोडवत नव्हता तर काहींनी तर चक्क आई-वडिलांनाच शाळेच्या आत सोडून देण्याचा हट्ट धरला होता. परंतु पालकांना प्रवेशद्वारावरच थांबविण्यात येत होते. शाळेच्या नियमांनुसार केवळ विद्यार्थीच आत येता येईल, असे शिक्षकांकडून सांगण्यात आले.
अनेकांना झाला उशीर
आज पहिलाच शाळेचा दिवस होता. बहुतेक पालकांनी मुलांना शाळेत पोहोचविण्यासाठी आॅटो आणि रिक्षांची व्यवस्था केली आहे. पण पहिल्याच दिवशी मुलांना स्वतंत्रपणे पाठविण्याचे धाडस मात्र काही पालकांनी केले नाही. त्यामुळे साऱ्या धावपळीत पालकच आज मुलांना घेऊन शाळेत आले. त्यात अनेकांना थोडा उशीरही झाला. पण पहिला दिवस असल्याने शाळा व्यवस्थापनानेही उशीर मान्य केला. लहान मुले रडत असल्याने पाल्यांकडे लक्ष द्यावे, त्याची काळजी घ्यावी, अशी विनंती पालकांनी शिक्षकांना केली. त्यात बऱ्याच पालकांनी आज पाल्यांना पुस्तकाशिवाय पाठविले.
‘ट्रॅफिक’मुळे खोळंबा
शाळेचा पहिलाच दिवस असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे आॅटोचालक आले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोडायला पालकांनाच यावे लागले.
शिवाय पहिल्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना सोडायला दुचाकी-चारचाकीतून पालक आले होते. त्यामुळे खामला, देवनगर, रामदासपेठ, धरमपेठ, प्रतापनगर इत्यादी भागात शाळांसमोर ‘ट्रॅफिक जॅम’ झाल्याचे दिसून आले. विशेषत: वर्धा मार्गावर सकाळच्या सुमारास वाहनांची गर्दी दिसून आली. (प्रतिनिधी)