बाल गुन्हेगारी वाढतेय
By Admin | Updated: April 3, 2017 02:53 IST2017-04-03T02:53:19+5:302017-04-03T02:53:19+5:30
उपराजधानीतील बालगुन्हेगारीचे स्वरूप दिवसेंदिवस भयावह होत आहे. अल्पवयीन असल्यामुळे प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या प्रेयसीच्या

बाल गुन्हेगारी वाढतेय
भयावह रूप मूळावर घाव भविष्यातून उठविण्याचे प्रयत्न
नरेश डोंगरे नागपूर
उपराजधानीतील बालगुन्हेगारीचे स्वरूप दिवसेंदिवस भयावह होत आहे. अल्पवयीन असल्यामुळे प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या प्रेयसीच्या संपूर्ण कुटुंबालाच संपविण्याचा घाट घालणारे नंदनवनमधील प्रकरण शनिवारी उजेडात आले. त्यानिमित्तानेच उपराजधानीत निर्ढावलेल्या बालगुन्हेगारीचा गंभीर विषय चर्चेला आला आहे.
काय चांगले, काय वाईट या मधील फरकही ज्यांना कळत नाही, ती १२-१५ वर्षे वयोगटातील मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यांच्याकडून घडलेले गुन्हे संबंधितांना भविष्यातूनच उठविणारे आहे. त्यामुळे बालगुन्हेगारीचा विषय अधिकच गंभीर बनला आहे. उपराजधानीत घडलेल्या आणि गेल्या महिनाभरात पोलिसांनी उघड केलेल्या गंभीर गुन्ह्यात २५ अल्पवयीन मुले सहभागी (आरोपी) असल्याचे उघड झाले आहे. त्यातील काहींनी केलेले गुन्हे सराईत गुंडांनाही तोंडावर हात ठेवायला लावणारे आहेत. चोऱ्या, घरफोड्या, फसवणूक, हाणामाऱ्या, अपहरण (पळवून नेणे)च नव्हे तर, या बालगुन्हेगारांनी (कायद्याच्या भाषेत विधीसंघर्षग्रस्त बालकांनी) बलात्कार आणि कटकारस्थान करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचेही गुन्हे केले आहेत. अवघे १६ आणि १७ वर्षे वय असलेली मुलगी-मुलगा एकमेकाच्या कथित प्रेमात आंधळे होतात. चार महिन्यांपुर्वी घरून पळून जातात. मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलीस त्यांना शोधतात. मुलीला पालकांच्या हवाली करतात तर, मुलाला रिमांड होममध्ये घालतात. दोन आठवड्यांपूर्वीच तो तेथून बाहेर येतो. मात्र, बाल सुधार गृहात राहिल्यानंतर त्याच्यात सुधार झालेला नसतो तर तो अधिकच बिघडतो.
कारण बाहेर येताच, तो प्रेयसीला मिळवण्यासाठी तिच्या संपूर्ण कुटुंबीयांनाच संपवण्याचा कट रचतो. त्यात त्याची प्रेयसीही सहभागी होते अन् स्वत:च्या हाताने जन्मदात्या आईवडिलांना, दोन भावंडांना विषाक्त पदार्थ खाऊ घालते. विषाचा दुष्परिणाम झाला नसल्याचे सांगून प्रियकराजवळ चिंताही व्यक्त करते अन् नंतर तिचा प्रियकर तिच्या वडिलांच्या छातीत धारदार शस्त्र भोसकून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करतो. नंदनवनमधील ही घटना समाजमन सुन्न करणारी आहे. या घटनेमुळेच कायद्याच्या भाषेत विधीसंघर्षग्रस्त बालके (अल्पवयीन आरोपी) किती खतरनाक बनत आहेत, त्यावर प्रकाश पडलेला आहे.
वेगळे प्रकरण
१६ वर्षांची मुलगी यशोधरानगर पोलीस ठाण्यात पोहचून तिच्यावर तिच्या घरी येणाऱ्या व्यक्तीने (वय ४५) पाशवी बलात्कार केल्याचे सांगते. बलात्कार करणाऱ्याला त्याच्या एका साथीदाराने मदत केल्याचाही आरोप लावते. या दोघांनी आधी हातपाय आणि तोंड घट्ट बांधले नंतर कुकर्म केल्याचे सांगते. मुख्य आरोपीचे नाव, पत्ता मुलीला माहीत असल्यामुळे पोलीस लगेच धावपळ करून त्या व्यक्तीला ठाण्यात आणतात. बदड बदड बदडतात. त्याच्या साथीदाराचे नाव पत्ता विचारला जातो. संबंधित व्यक्ती जीवाच्या आकांताने ओरडते. मी हिच्याकडे आपल्या मुलीसारखा स्रेहाने बघतो.
ज्या रात्री घटना घडल्याचे ती सांगते, त्या रात्री आपण बीअरबारमध्ये नेहमीप्रमाणे कामावर होतो. तेथील सीसीटीव्ही फुटेज बघा,असेही सांगतो. पोलीस सीसीटीव्ही फुटेज बघतात. ती व्यक्ती खरी अन् स्वत:चे कपडे फाटलेल्या अवस्थेत ओल्या डोळ्यांनी ठाण्यात पोहचलेली मुलगी खोटे बोलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येते. त्यामुळे पोलीस तिला वेगळ्या पद्धतीने विचारपूस करतात. शेवटी ती बलात्कार झालाच नाही, तक्रार खोटी असल्याचे कबूल करते. आता प्रश्न उरतो, तिने असे का करावे? उत्तर तेवढेच धक्कादायक आहे. संबंधित व्यक्ती वेळी अवेळी तिच्या घरी येते. त्यामुळे मुलीला भेटायला येणाऱ्या तिच्या बॉयफ्रेण्डला अडचण होत असते. त्यामुळे ही मुलगी अन् तिचा बॉयफ्रेण्ड ‘त्या‘ व्यक्तीचे घरी येणे बंद करण्यासाठी असा खतरनाक कट रचतात. आता बोला...!(प्रतिनिधी)