बापाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुलावर हल्ला
By Admin | Updated: April 27, 2016 03:00 IST2016-04-27T03:00:10+5:302016-04-27T03:00:10+5:30
बापाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मृताच्या मुलाने आरोपीच्या मुलावर प्राणघातक हल्ला चढवला.

बापाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुलावर हल्ला
खून का बदला खून : धंतोलीत थरार
नागपूर : बापाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मृताच्या मुलाने आरोपीच्या मुलावर प्राणघातक हल्ला चढवला. ही थरारक घटना सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास धंतोलीत घडली. यात सौरभ संजय अलोणे (वय २०) गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी लगेच धावपळ करून सहा आरोपींच्या मुसक्या बांधल्या. अमन जीवन खरे (वय २२, रा. रामबाग), निकुंज कमलाकर मेश्राम (वय २६, रा. दाभा वाडी) तसेच त्यांचे तीन अल्पवयीन साथीदार यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे.
या हल्ल्याचा मुख्य आरोपी बादल राजू गजभिये (वय २५) आहे. तो रामबागमध्ये राहतो. गेल्या वर्षी आरोपी संजय अलोणे याने आपल्या साथीदारांच्या मदतीने बादलचे वडील राजू गजभिये याची हत्या केली होती. त्यामुळे बापाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बादलने संजयच्या मुलाची हत्या करण्याचा कट रचला. त्यानुसार ८ ते ९ साथीदारांना गोळा करून सोमवारी रात्री ९.३० पासून बादल सौरभच्या मागे लागला. चुनाभट्टी परिसरात सौरभ एकटा मिळताच बादल आणि त्याच्या साथीदारांनी तलवारीचे घाव घालून आणि दगडाने ठेचून सौरभची हत्या करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूची मंडळी धावल्यामुळे आरोपी पळून गेले. गंभीर अवस्थेत सौरभला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची आई अनिता संजय अलोणे (वय ३५, रा. कौशल्या नगर) यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
मुख्य आरोपी फरार
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत उपायुक्त ईशू सिंधू, सहायक आयुक्त आर.आर. कापगते, गुन्हेशाखेचे निलेश राऊत, धंतोलीचे ठाणेदार राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक के. एन. गड्डीमे, गुन्हेशाखेचे श्री सानप, सुदाम मुंडे, श्रीनिवास मिश्रा, राजकुमार देशमुख, हवालदार महादेव थोटे, भय्याजी डेहनकर, अफसर खान पठाण, लक्ष्मण शेंडे, सुनील चौधरी, राजेंद्र सेंगर, अमीत पात्रे, प्रकाश ताकवत, प्रवीण ठाकूर, विशाल ठाकूर यांनी तत्परतेने चौकशी करून आरोपी अमन जीवन खरे, निकुंज कमलाकर मेश्राम तसेच त्यांचे तीन अल्पवयीन साथीदार यांना अटक केली. जखमी सौरभ संजय अलोणे याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर मेडिकल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. मुख्य आरोपी बादल गजभियेसह फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.