मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष आता नागपुरातही
By Admin | Updated: January 26, 2016 03:34 IST2016-01-26T03:34:11+5:302016-01-26T03:34:11+5:30
राज्यातील आर्थिकदृष्टया दुर्बल असणाऱ्या गरीब आणि दुर्धर आजारावर उपचार करण्यास अक्षम व्यक्तींसाठी आता मुंबईनंतर

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष आता नागपुरातही
नागपूर : राज्यातील आर्थिकदृष्टया दुर्बल असणाऱ्या गरीब आणि दुर्धर आजारावर उपचार करण्यास अक्षम व्यक्तींसाठी आता मुंबईनंतर राज्यात नागपूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या समितीची पहिली बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली.
मुख्यमंत्री सचिवालयात यासंदर्भात मदत मिळण्यासाठी राज्यभरातून अनेक अर्ज प्राप्त होतात. तथापि, या आजाराव्यतिरिक्तही जीवितास धोका असलेले आजार तसेच अपघातातील रुग्ण असतात. मुंबई सचिवालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाच्या धर्तीवर विदर्भातील रुग्णांना मुंबईला न जाता येथेच तत्काळ मदत मिळावी, यासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
यासाठी नागपुरात वैद्यकीय साहाय्यता कक्षामध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाननी करण्यासाठी नागपूर विभाग कार्यकारिणी समिती गठित करण्यात आली असून, या समितीमध्ये विभागीय आयुक्त, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नोडल अधिष्ठाता, उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक हे सदस्य तर डॉ. के.आर. सोनपुरे हे मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सदस्य सचिव यांचा समावेश आहे.
या समितीची पहिली बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. या बैठकीमध्ये दोन अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये बाबूराव ढोके, कामठी यांना वैद्यकीय साहाय्यता पुरविण्यात आली आहे. तर दुसरा अर्ज डिम्पल दीपक मोते या मूक-बधिर मुलीचा प्राप्त झाला. मात्र तो प्रलंबित ठेवण्यात आला आहे. डिम्पल मोते हिला डिसेंबर २०१५ मध्ये या समितीमार्फत वैद्यकीय साहाय्य देण्यात आले. असे असले तरीही विशेष बाब म्हणून हा अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत एका व्यक्तीला तीन वर्षांत फक्त एकदाच ही मदत देता येते, अशी माहिती डॉ. के.आर. सोनपुरे यांनी दिली.(प्रतिनिधी)
हैदराबाद हाऊस येथे कक्ष
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून मदत हवी असल्यास पात्र रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष नागपूर विभाग मुख्यमंत्री सचिवालय हैद्राबाद हाऊस सिव्हिल लाईन नागपूर येथे संपर्क साधावा.