सिंथेटिक ट्रॅकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६ सप्टेंबरला लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:45 IST2017-09-12T00:44:42+5:302017-09-12T00:45:04+5:30
कोराडी मार्गावरील विभागीय क्रीडा संकुलात साकारलेल्या ४०० सिंथेटिक अॅथ्लेटिक्स ट्रॅकचे लोकार्पण येत्या १६ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.

सिंथेटिक ट्रॅकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६ सप्टेंबरला लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोराडी मार्गावरील विभागीय क्रीडा संकुलात साकारलेल्या ४०० सिंथेटिक अॅथ्लेटिक्स ट्रॅकचे लोकार्पण येत्या १६ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.
४० वर्षे शहरात सिंथेटिक ट्रॅकची मागणी प्रलंबित होती. १० वर्षांपूर्वी सिंथेटिक ट्रॅकचे बांधकाम सुरू करण्यात आल्यानंतर, विविध अडथळ्यांमुळे खेळाडूंसाठी ट्रॅक उपलब्ध होऊ शकला नाही. येथे आयोजित दोन दिवसांच्या प. विभागीय अॅथ्लेटिक्स स्पर्धेचे उद्घाटन आणि ट्रॅकचे लोकार्पण मुख्यमंत्री एकाचवेळी करतील. उद्घाटनासाठी दुपारी १.३० ची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौºयाआधी महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी सिंथेटिक ट्रॅकची पाहणी केली. त्यांच्यासमवेत क्र ीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, नागपूर जिल्हा अॅथ्लेटिक्स असोसिएशनचे सचिव शरद सूर्यवंशी, सदस्या अर्चना कोट्टेवार प्रामुख्याने उपस्थित होते.
ट्रॅकशेजारी ड्रेसिंग रूम आणि प्रेक्षागॅलरीचे काम सुरूच आहे. या बांधकामाची देखील पाहणी महापौरांनी केली.
पुण्यातील बालेवाडी स्टेडियमच्या धर्तीवर हा ट्रॅक बनविण्यात आल्याची माहिती रेवतकर यांनी महापौरांना दिली. अद्ययावत सुविधा असून फ्लड लाईटची व्यवस्था आहे. पाण्याचे स्प्रिंकल लावण्यात आले असून, पाणी ट्रॅकवर साचणार नाही, याचीदेखील काळजी घेण्यात आली आहे. अंतर्गत रस्त्यांचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती रेवतकर यांनी दिली.
काही उणिवा दूर, काही कायम : सूर्यवंशी
सिंथेटिक अॅथ्लेटिक्स ट्रॅकला इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ अॅथ्लेटिक्स फेडरेशनने(आयएएएफ)तांत्रिक मान्यता दिली आहे. आयएएएफने या ट्रॅकला ‘क्लास-२ सर्टिफिकेशन’ दिले आहे. दरम्यान, जिल्हा संघटनेने सिंथेटिक ट्रॅकची पाहणी केली होती. त्यांनी अनेक त्रुटी असल्याचे मीडियाला सांगितले होते. आज सूर्यवंशी यांना विचारणा केली तेव्हा ज्या त्रुटी स्थानिक स्तरावर दूर करता आल्या त्या केल्या, पण काही त्रुटी अद्यापही असल्याचे मान्य केले. ट्रॅक पूर्णपणे सज्ज झाला असे म्हणता येईल का, असा प्रश्न करताच त्यांनी केवळ स्मितहास्य केले.