पंकजा मुंडेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
By Admin | Updated: July 1, 2015 03:11 IST2015-07-01T03:11:53+5:302015-07-01T03:11:53+5:30
महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या २०६ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी तसेच अंगणवाडीला पुरविण्यात आलेल्या ...

पंकजा मुंडेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
राष्ट्रवादी युवक काँग्रेस : व्हेरायटी चौकात धरणे आंदोलन
नागपूर : महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या २०६ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी तसेच अंगणवाडीला पुरविण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या मालाचा विरोध राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. राज्य शासनातील मंत्र्यांचे घोटाळे नऊ महिन्यातच बाहेर येत असून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. जनतेच्या या फसवणुकीची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्हेरायटी चौकात धरणे आंदोलनात केली.
पंकजा मुंडे यांच्या विरोधात नारे देत त्यांनी मंत्रिपदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष विशाल खांडेकर यांनी यावेळी केली. याप्रसंगी संतप्त कार्यकर्त्यांनी चक्का जाम करण्याचाही प्रयत्न केला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्वरित न्यायिक आयोग स्थापन करून पंकजा मुंडे यांची चौकशी करावी आणि चौकशीचा अहवाल येईपर्यंत पंकजा मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी आणि नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. भाजपने नऊ महिन्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराची सीमा पार केली आहे. यानंतर चार वर्षाचा कालावधी असून या काळात भाजप जनतेची किती लूट करणार, हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. नैतिकतेच्या आधारावर सामान्य जनतेची फसवणूक करून निवडून आलेला भाजपाने जनतेची लूट चालविली आहे. पंकजा मुंडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराने हे उघडच झाले आहे. त्यामुळे न्यायिक आयोग स्थापन करावा आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपदावरून पायउतार करावे, अशी जोरदार मागणी करीत कार्यकर्त्यांनी भाजप आणि पंकजा मुंडे यांच्याविरोधात घोषणा दिल्या. हे आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल खांडेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर, राजू नागुलवार, ईश्वर बाळबुधे, मोंटी गंडेचा, संतोषसिंग, रम्ज सिद्धीकी, मयूर उमरकर, अशरफ खान, शेखर पाटील, शैलेश पांडे, रोशन भिमटे, मोहम्मद जुनेद, अमोल लारोकर, अमोल खडगी, पिंटू मेश्राम, राजू भोतमांगे, राहुल खेडकर, प्रकाश लांजेवार, राजू सरवर, प्रफुल्ल खेडकर, प्रवीण मेश्राम, रिंकी नायडू, जावेद शेख, योगेश पिल्ले आणि लखन पाटील आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)