मुख्यमंत्री फडणवीस-ओवैसी आज आमने-सामने
By Admin | Updated: January 7, 2017 02:47 IST2017-01-07T02:47:43+5:302017-01-07T02:47:43+5:30
जिल्ह्यातील नऊ नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस-ओवैसी आज आमने-सामने
नागपूर : जिल्ह्यातील नऊ नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. नऊही नगर परिषदेत भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली असून या सर्वांमध्ये कामठी नगर परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कामठी येथे शनिवारी (दि. ७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमआयएम (आॅल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन)चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा होत आहे. या दोन्ही सभांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. ऐनवेळी राजकीय समीकरणात बदलही या सभांनी होऊ शकतात.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी हा मतदारसंघ आहे. त्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपमध्ये काही काळ राहिलेले रणजित सफेलकर हे अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत.
भाजप - बहुजन रिपब्लिकन एकता मंच युतीकडून अजय कदम, काँग्रेसकडून शहाजहॉ शफाअत, शिवसेनेकडून राधेश्याम हटवार, भारिप बहुजन महासंघाकडून प्रमोद कांबळे, बहुजन मुक्ती पार्टीकडून हेमलता पाटील, बसपकडून आशिष जाधव आदी उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यासोबतच एमआयएम (आॅल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन )कडून खालिद अन्वर मुख्तार अहमद हे निवडणूक मैदानात उतरले आहे. त्यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत आली आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची शनिवारी (दि. ७) कामठीच्या रुईकर मैदान येथे सायंकाळी ७ वाजता सभा होणार आहे. त्यासोबतच भाजप - बरिएमंचच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सभा सायंकाळी ५ वाजता होणार आहे. कामठीत मुस्लिमबहुल मतदार आहेत. राजकीय समीकरण बदलविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. या दोन्ही सभेनंतर राजकीय समीकरण बदलले जाऊ शकते.
अलीकडेच राज्यातील नगर परिषद निवडणुकीत अनपेक्षित यश मिळवून भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या पार्श्वभूमीवर या दोन्ही सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)