योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: बाजारगावजवळील स्फोटाच्या घटनास्थळाचा आढावा घेऊन मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे नागपुरकडे परतत असताना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ मुख्यमंत्र्यांच्या समोर एक अपघात झाल्याचे चित्र त्यांना दिसले. त्या ठिकाणी अपघातामध्ये एका ट्रक आणि बाईकची धडक झाली होती. त्याचवेळी त्या ट्रकला एक कार धडकली व कारला एक बस धडकली. त्यात काही जण जखमी झाले. बाईकस्वार तरुण ट्रक खाली अडकला होता व गंभीर अवस्थेत होता.त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव होता, मात्र त्याला कोणी मदत करत नव्हते.
मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणची गर्दी आणि तो अपघात पाहताच त्यांचा ताफा तिथे थांबवायची सूचना केली. त्यानंतर मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे त्या ठिकाणी स्वतः खाली उतरले व त्यांनी त्या तरुणाला ट्रकच्या खालून काढायला लावले. त्याचा पाय गंभीर जखमी होता. तिथे ॲम्बुलन्स बोलवण्यात आली आणि त्या जखमी तरुणाला रुग्णवाहिकेत घेऊन मुख्यमंत्री स्वतः रवी नगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन गेले. त्या ठिकाणी त्या तरुणाला दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. तरुणाला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्याच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था केली. तसेच इतर जखमी रुग्णांना तेथे आणण्याच्या सूचना केली. मुख्यमंत्र्यांचा ताफा त्या ठिकाणी थांबला नसता गंभीर अवस्थेतील तरुणाच्या जीवाचे बरे वाईट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी एनवेळी तत्परता दाखवून त्या तरुणाला रुग्णवाहिका बोलवून रुग्णालयात दाखल केले.