मुख्यमंत्र्यांनी लावला सीपींना फोन...
By Admin | Updated: August 3, 2015 02:43 IST2015-08-03T02:43:43+5:302015-08-03T02:43:43+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिन्यातून दोन रविवारी तरी नागपुरात येतात. रामगिरीवर सामान्य नागरिकांना थेट भेटण्याची संधी देऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेतात.

मुख्यमंत्र्यांनी लावला सीपींना फोन...
तक्रारीची घेतली दखल : शहरात दहशतीचे वातावरण नको
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिन्यातून दोन रविवारी तरी नागपुरात येतात. रामगिरीवर सामान्य नागरिकांना थेट भेटण्याची संधी देऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेतात. यामुळेच दरवेळी मुख्यमंत्र्यांसमोर गऱ्हाणी मांडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे नागरिकांनी रामगिरीवर गर्दी केली. अशातच एका महिलेने आपल्याला समाजकंटकाकडून त्रास होत असल्याची तक्रार केली. मुख्यमंत्र्यांनी लगेच त्याची दखल घेतली. तातडीने पोलीस आयुक्तांना फोन लावण्याच्या सूचना दिल्या. संबंधित व्यक्तीचा त्वरित बंदोबस्त करा, असे कडक निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आणि महिलेच्या चेहऱ्यावर सीएम आपलेच असल्याचे समाधान झळकले.
रविवारी दिवसभर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्याच्या सूचना हैदराबाद हाऊस येथील सचिवालयाला दिल्या आहेत. त्यामुळे नागपूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रविवारी सुमारे ४५० नागरिकांनी मुख्यमंत्र्यांपुढे आपले गऱ्हाणे मांडले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे प्रश्न ऐकून घेतले व शक्य तेवढ्या प्रकरणात यंत्रणेला निर्देश देत तातडीने दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांना दिवसभर भेटणाऱ्यांमध्ये अपंग संघटनांचे प्रतिनिधी, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी अशा अनेकांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. काहींचे प्रश्न तत्काळ निघाली निघाले. (प्रतिनिधी)
सर्वांना येऊ द्या लोक दुरून येतात
मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी रामगिरीच्या प्रवेशद्वारावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यात बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांचीही मोठी संख्या होती. मात्र, सुरक्षा यंत्रणा सर्वांनाच आत सोडत नव्हती. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेली. त्यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सर्वांना आत येऊ देण्याचे निर्देश दिले. ‘सर्वांना येऊ द्या, लोक खूप दुरून येतात. त्यांची कामे आपण केलीच पाहिजे. मोठ्या आशेने ते येतात. त्यांना अडवू नका’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना आत बोलावून घेतले. या वेळी रामगिरीत प्रवेश मिळालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते.