मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या तळमळीला नोकरशाहीचा खोडा
By Admin | Updated: May 31, 2015 02:51 IST2015-05-31T02:51:37+5:302015-05-31T02:51:37+5:30
दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी समाधान शिबिर आयोजित केले.

मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या तळमळीला नोकरशाहीचा खोडा
नागपूर : दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी समाधान शिबिर आयोजित केले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या शिबिरासाठी वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पाठपुरावा केला. मात्र, प्रत्यक्ष शिबिरात काहींचेच समाधान झाले, तर अनेकांना निराश होऊन परतावे लागले. मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या तळमळीला नोकरशाहीचा खोडा खऱ्या अर्थाने शिबिरात पाहायला मिळाला. तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांना इकडून तिकडे पाठविले जात होते. सुनावणी होणार असलेल्या कक्षात शिस्तबद्धता नव्हती. अधिकाऱ्यांच्या भोवती तक्रारकर्त्यांचा घोळका होता. अधिकारी-कर्मचारी वरवर तक्रारकर्त्याचे कागदपत्र पाहत होते व योग्य निर्णय घेऊ, असे सांगून वेळ मारून नेत होते. अधिकाऱ्यांच्या अशा भूमिकेमुळे अनेकांना न्याय न मिळताच परतावे लागले. निराश होऊन परतणारे लोक मुख्यमंत्री, मंत्री कुणीही झाले तरी अधिकारीशाही बदलल्याशिवाय काहीच बदलणार नाही, अशा शब्दात नाराजी व्यक्त करीत होते. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, त्यांना कालबद्ध निर्णय घेण्यास बाध्य करावे, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.