‘छडी लागे छम छम ’ आता होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 10:00 PM2018-07-07T22:00:03+5:302018-07-07T22:03:29+5:30
छडी लागे छम छम.. विद्या येई घम घम... बालपणी एकलेली म्हण आता कालबाह्य होणार आहे. कारण शिक्षण विभागाने शाळेतून छडी गायब करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने केलेल्या सूचनांनुसार विभागाने हा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छडी लागे छम छम.. विद्या येई घम घम... बालपणी एकलेली म्हण आता कालबाह्य होणार आहे. कारण शिक्षण विभागाने शाळेतून छडी गायब करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने केलेल्या सूचनांनुसार विभागाने हा निर्णय घेतला आहे.
गृहपाठ केला नाही, शाळेत दंगा केला, अभ्यास केला नाही, पाढे पाठ केले नाहीत, अशा विविध कारणांसाठी अंगठे धरायला लावणे, भिंतीला खुर्चीसारखे उभे करणे, यासह हातावर छम छम छड्याही पडायच्या. मुलांचा हात रक्तबंबाळ होत असे. पण त्याची पर्वा शिक्षकांना नसे. त्या काळातील शिक्षक मारकुटे होते, तरी त्यांचे आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेमही होतं. आपल्या विद्यार्थ्यांनी शिकून मोठे व्हावे, आपल्या घराचे, गावाचे, देशाचे नाव मोठे करावे, असे त्यांना वाटत असे. त्यामुळेच मार खाल्लेल्या त्या विद्यार्थ्यांची शाळेबद्दलची ओढ कायमच असायची. तेव्हा पालकही शिक्षकांनी मारहाण केली तरी शिक्षकाला जाब विचारायला जात नसत. विशेष म्हणजे तेव्हा मारकुटा मास्तर म्हणजे अधिक चांगला अशी समजूत होती. छडी लागे छम छम, विद्या येई घम घम, यावर पालकांचा आणि समाजाचाही विश्वास होता.
परंतु कालांतराने शिक्षणाच्या पद्धतीत बदल करण्यात आले. आनंददायी शिक्षणाची नवी परंपरा सुरू झाली. मुलांना शाळेबद्दल ओढ लागायला हवी, त्यांना शाळेत जावेसे वाटावे, यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागावे, अशी सरकारच्या शिक्षण खात्याची अपेक्षा आहे. त्यातच २००९ मध्ये लागू झालेल्या बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यातच बालकांना शारीरिक शिक्षा आणि मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने सुद्धा गुरुजींच्या छडीवर आक्षेप घेतला आहे. आनंददायी शिक्षणाच्या नादात शिक्षण विभागाने गुरुजींच्या हातची छडीही गायब केली आहे.
शुक्रवारी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शाळेमधून छडी वगळण्याच्या आदेश शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.
विद्यार्थ्यांमधील धाक संपेल
आजचा विद्यार्थी तांत्रिक झाला आहे. कॉम्प्युटर, मोबाईल यात त्याचा सर्वाधिक वेळ जात आहे. पालकांवर चिडचिड करायला लागला आहे. आनंददायी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधील शिक्षकांची भीतीही हरविली आहे. गुरुजींची छडी ही मारण्यासाठी नव्हतीच, तो धाक होता, जो विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता. छडी गायब केल्याने हा धाकच संपणार आहे.
सपन नेहरोत्रा, शिक्षक