रंगांचा केमिकल लोचा
By Admin | Updated: March 13, 2017 01:56 IST2017-03-13T01:56:53+5:302017-03-13T01:56:53+5:30
रसायनयुक्त रंग आरोग्यासाठी घातक असल्यामुळे इको फ्रेण्डली रंग वापरण्याचे आवाहन केले जाते.

रंगांचा केमिकल लोचा
हर्बल रंग नावापुरतेच : जनजागृतीचा परिणाम शून्य
नागपूर : रसायनयुक्त रंग आरोग्यासाठी घातक असल्यामुळे इको फ्रेण्डली रंग वापरण्याचे आवाहन केले जाते. मात्र, त्यानंतरही पैसे वाचविण्यासाठी तसेच आपला रंग घट्ट व्हावा या नादात रसायनयुक्त रंगच खरेदी केले जात असल्याचे निदर्शनास आले. रंगांचा हा केमिकल लोचा शरीरासाठी महागात पडू शकतो, याचा अनेकांना विसर पडल्याचे दिसून आले.
शहरातील काही रस्त्यांवर, चौकात रंग विक्रीची दुकाने सजली होती. १० रुपये ते ३० रुपयांपर्यंत रंगाची एक डबी विकल्या जात होती. खुल्या रंगांनाही अधिक मागणी होती. या दुकानांमध्ये लोकमत प्रतिनिधीने फेरफटका मारला असता इको फ्रेण्डली रंग वापरण्याबाबत सर्व माहिती असूनही तो खरेदी करण्याची मानसिकता मोजक्याच नागरिकांमध्ये दिसून आली. २५ पैकी एखाददुसरी व्यक्ती इको फे्रण्डली रंगांबाबत विचारत होती. मात्र, इको फ्रेण्डली रंग नाही म्हटल्यावर कुणीही माघारी फिरत नव्हते. आहे तो रंग खरेदी करण्यात धन्यता मानत होते.
दोन प्रकारच्या गुलालांची विक्री होताना दिसली. एका गुलालाचा दर प्रती किलो ४५ ते ५० रुपये होता. तर दुसऱ्या गुलालाचा दर ६५ ते ७० रुपये किलो होता.
गुलालाचे असे वेगवेगळे दर का अशी विचारणा केली असता एक हलक्या प्रतीचा व दुसरा उच्च प्रतीचा असल्याचे दुकानदाराने स्पष्ट केले. घरी वापरायचा असेल तर उचा घ्या, बाहेर खेळायचा असेल तर हलका घ्या, असा सल्लाही दुकानदार देत होता. जास्तीत जास्त लोक पैसे वाचविण्यासाठी हलका गुलाल खरेदी करताना दिसले. काही उच्चशिक्षित लोक रंग खरेदी करण्याऐवजी उच्चप्रतीचा गुलाल खरेदी करताना दिसले. मात्र, अशांची संख्या कमी होती.