नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

By Admin | Updated: June 11, 2016 03:23 IST2016-06-11T03:23:23+5:302016-06-11T03:23:23+5:30

अमरावती जिल्हा परिषद शाळेत कनिष्ठ लिपिक पदाची नोंकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २० जणांची एक कोटी रुपयांनी ..

Cheating by showing bait for the job | नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

मुख्याध्यापिका अटकेत : दोन आरोपी फरार
नागपूर : अमरावती जिल्हा परिषद शाळेत कनिष्ठ लिपिक पदाची नोंकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २० जणांची एक कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात मौदा पोलिसांनी जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला कैलाशगिरी पुरी ऊर्फ खर्डेकर, रा. ऊर्जा कॉलनी, नौसारी, अमरावती यांना अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी फरार आहेत. नागपुरातील एका शाळेचे अस्थायी लिपिक पुरुषोत्तम बुरडे यांनी आत्महत्या केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.
बुरडे हे नरेंद्रनगर येथील ठाकूर ग्रीन व्हॅली शाळेत लिपिक होते. २०१४ मध्ये अजय याने बुरडे यांची ओळख चंद्रकला यांच्याशी करवून दिली. मी जि.प. ची उपशिक्षणाधिकारी असून जिल्हा परिषद शाळेत कनिष्ठ लिपिक पदासाठी मोठ्या प्रमाणात पदभरती होणार असल्याचे चंद्रकला यांनी बुरडे यांना सांगितले.
तुमच्या ओळखीतील कुणी असेल तर त्याला नोकरी लावून देऊ, असेही चंद्रकला यांनी सांगितले. बुरडे हे चंद्रकला यांच्या आमिषाला बळी पडले, ओळखीच्या सहा युवकांना याबाबत सांगितले. चंद्रकला यांनी प्रत्येक युवकाकडून ६ लाख रुपये घेतले. त्यानंतर चंद्रकला यांनी चारित्र्य पडताळणीचे पत्र सहा युवकांच्या घरी पाठविले. त्यानंतर त्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले. यानंतर अन्य युवकांना जाळ्यात ओढून चंद्रकला यांनी त्यांच्याकडून सुमारे १ कोटी रुपये घेतले. एका युवकाला मात्र नियुक्तीपत्रातील स्वाक्षरीवर संशय आला.
त्याने स्वाक्षरीची तपासणी केली असता ती बोगस असल्याचे आढळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकांनी चंद्रकला यांना पैसे परत मागितले. मात्र तिने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे युवकांना धक्का बसला. त्यांनी बुरडे यांना पैसे मागितले. त्यामुळे बुरडे यांनी ७ जुन रोजी मौदा पुलाजवळ झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
पोलिसांनी बुरडे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. चंद्रकला व अजय खोबरकर यांच्यामुळे आत्महत्या करीत असून मुलीला आयपीएस अधिकारी बनविण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक चोपडे व त्यांच्या सहकार्यांनी गुरुवारी चंद्रकलाला अमरावती येथून अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Cheating by showing bait for the job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.