रिझर्व्ह बँक योजनेच्या नावावर फसवणूक
By Admin | Updated: June 28, 2014 02:37 IST2014-06-28T02:37:47+5:302014-06-28T02:37:47+5:30
भारतीय रिझर्व्ह बँक नवी दिल्ली गव्हर्नर कार्यालय या नावाने उपराजधानीतील नागरिकांना ५ लाख पौंड रकमेचे बक्षीस लागल्याचे ई-मेल पाठविले जात आहे.

रिझर्व्ह बँक योजनेच्या नावावर फसवणूक
नागपूर : भारतीय रिझर्व्ह बँक नवी दिल्ली गव्हर्नर कार्यालय या नावाने उपराजधानीतील नागरिकांना ५ लाख पौंड रकमेचे बक्षीस लागल्याचे ई-मेल पाठविले जात आहे. सोबतच ही गोष्ट सार्वजनिक करण्यात येऊ नये, अशी सूचनावजा ताकीदसुद्धा दिली जात आहे. बक्षिसाची रक्कम मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना ‘क्रेडिटिंग फी’ म्हणून २१ हजार ५०० रुपये जमा करण्यास सांगितले जात आहे. पहिल्या नजरेत जागरूक नागरिकांचा यावर विश्वास बसत नाही. परंतु या मेलसोबतच गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचे छायाचित्र आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचा अधिकृत लोगो असलेले पत्र पाहून नागरिक द्विधा मनस्थितीत आहेत.
या ई-मेलच्या माध्यमातून संबंधित टोळीतर्फे कथित मॅनेजर डॉ. पीटर जोसेफ यांच्या ई-मेलवर संपर्क करण्याचा सल्लाही दिला जात आहे. यापद्धतीने व्यक्तीचे पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, फॅक्स नंबर, व्यवसाय, वय, नागरिकता, राज्य, ई-मेल आयडी, बँक शाखेच्या नावावर बँक खाते क्रमांकही मागितले जात आहे. याप्रकारचे ई-मेल आल्याने शहरातील काही जागरूक व्यावसायिकांना यासंबंधात तक्रार कुठे करावी, असा प्रश्न पडला आहे. काही नागरिक तर थेट रिझर्व्ह बँकेत पोहचून विचारपूस करीत आहेत. सूत्रानुसार याच प्रकरणात वर्धेतील एका व्यापाऱ्याने काही दिवसांपूर्वी ७ लाख रुपये गमावले आहे, असे असतानाही त्यांना अजूनही अज्ञात लोकांकडून फोन कॉल येत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, अशा कुठल्याही योजनेशी रिझर्व्ह बँकेचा कुठलाही संबंध नाही. एका पीडित खातेदाराला आपण त्याचा मोबाईल क्रमांक बदलवण्याचा सल्लासुद्धा दिला आहे. (प्रतिनिधी)