कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:08 IST2021-05-12T04:08:11+5:302021-05-12T04:08:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाबाधित महिलेच्या उपचाराची व्यवस्था करून देतो, अशी थाप मारून दोन भामट्यांनी एका महिलेकडून एक ...

कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित महिलेच्या उपचाराची व्यवस्था करून देतो, अशी थाप मारून दोन भामट्यांनी एका महिलेकडून एक लाख ६० हजार रुपये हडपले. महिलेच्या मृत्यूनंतर आरोपींची बनवाबनवी उघड झाली. त्यामुळे सक्करदरा पोलिसांनी निखिल नरेंद्र आटोले (वय ३५) आणि संकेत विलासराव पुरडवार या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
जयश्री रुपेश नंदनवार (वय ३५) या नरसाळ्यात राहतात. त्यांच्या सासू लक्ष्मीबाई नंदनवार यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना सक्करदऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २२ एप्रिलला दुपारी १२ च्या सुमारास आरोपी निखिल आटोले (रा. हुडकेश्वर) याने जयश्री यांच्याशी चर्चा केली. दुसऱ्या एका खाजगी इस्पितळात कोरोना रुग्णांची उत्तम देखभाल आणि उपचार केले जातात. तेथे रेमडेसिविर इंजेक्शन आणि बेड उपलब्ध आहेत, असे सांगून आरोपींनी २२ ते २८ एप्रिल दरम्यान जयश्री यांच्याकडून एक लाख साठ हजार रुपये घेतले. ही रक्कम आरोपी निखिलने त्याचा साथीदार संकेत पुरडवार याच्या बँक खात्यात जयश्री यांना जमा करायला लावली होती. दरम्यान, सासूचे निधन झाल्यामुळे जयश्री यांनी आरोपींना पैशाची मागणी केली. तेव्हा ते टाळाटाळ करू लागले. आरोपींनी आपले मोबाइलही बंद केले. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे जयश्री यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
विशेष म्हणजे, आरोपी निखिलने स्वतःला मेडिकलचा पीआरओ तर संकेतची डॉक्टर म्हणून ओळख सांगितली होती. पोलीस या दोघांची चौकशी करीत आहेत.