प्लॅटफॉर्मपेक्षा करंट तिकीट स्वस्त !
By Admin | Updated: April 1, 2015 02:43 IST2015-04-01T02:43:26+5:302015-04-01T02:43:26+5:30
रेल्वेचाही अजब कारभार आहे. एकीकडे प्लॅटफॉर्मवर प्रवेश घेण्यासाठी फ्लॅटफॉर्म तिकीटची किंमत वाढवून १० रुपये करण्यात आली आहे ...

प्लॅटफॉर्मपेक्षा करंट तिकीट स्वस्त !
आनंद शर्मा नागपूर
रेल्वेचाही अजब कारभार आहे. एकीकडे प्लॅटफॉर्मवर प्रवेश घेण्यासाठी फ्लॅटफॉर्म तिकीटची किंमत वाढवून १० रुपये करण्यात आली आहे तर दुसरीकडे अजूनही या तिकिटाच्या अर्ध्या किमतीत म्हणजे ५ रुपयांत पॅसेंजर रेल्वेने प्रवास करीत आहेत. याचाच फायदा घेऊन रेल्वे स्टेशनवर बरेच लोक फ्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करण्याऐवजी पॅसेंजरचे तिकीट खरेदी करण्याची शक्यता आहे. हे प्रकरण जाणून घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने मंगळवारी नागपूर रेल्वे स्टेशनवरील करंट तिकीट काऊंटरवरून नागपूर- इतवारी पॅसेंजरचे इतवारीपर्यंतचे तिकीट खरेदी केले. यासाठी फक्त पाच रुपये द्यावे लागले. या तिकीटावर पाच किलोमीटरपर्यंतचा प्रवास सहज करता येतो. करंट तिकीट रात्री १२ पर्यंत वैध असते. सध्या फ्लॅटफॉम तिकीट ५ रुपये आहे. १ एप्रिल पासून ते १० रुपये होणार आहे. या तिकिटावर फ्लॅटफॉर्मवर दोन तास घालविता येतात. हा फरक पाहता फ्लॅटफॉर्म तिकीट घेण्यापेक्षा करंट तिकीट घेणे प्रवाशांसाठी जास्त सोयीचे ठरणार आहे.
याबाबत मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. सुमत देऊळकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले, रेल्वे स्टेशनवर होणारी गर्दी कमी करण्यासाठीच १ एप्रिल पासून फ्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढविण्यात येत आहेत. मात्र, पॅसेंजर गाडीचे तिकीट किमान किती असावे याबाबत अद्याप कुठलेही परिपत्रक आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागपूर ते इतवारी पॅसेंजरचे तिकीट ५ रुपयेच राहील हे ही स्पष्ट झाले आहे.(प्रतिनिधी)