चावला यांनी कोर्टात भरले ५० लाख
By Admin | Updated: September 10, 2015 03:27 IST2015-09-10T03:27:12+5:302015-09-10T03:27:12+5:30
वासनकर वेल्थ मॅनेजमेंटने शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधीने लुबाडणूक केल्याप्रकरणी बुधवारी संतदास चावला यांनी...

चावला यांनी कोर्टात भरले ५० लाख
वासनकर गुंतवणूकदार फसवणूक प्रकरण
नागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंटने शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधीने लुबाडणूक केल्याप्रकरणी बुधवारी संतदास चावला यांनी एमपीआयडी कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात ५० लाखांची रोख रक्कम डीडीच्या स्वरूपात जमा केली.
चावला यांची सदोदय इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. या कंपनीतील खात्यात उलाढाल होऊन वासनकर वेल्थ मॅनेजमेंट समूहाचे प्रशांत वासनकर, विनय वासनकर आणि भाग्यश्री वासनकर यांच्या खात्यातील ५० लाख रुपये चावला यांच्या खात्यात वळते करण्यात आले होते. आर्थिक गुन्हे पथकाला तपासात ही बाब समजताच त्यांनी चावला यांच्या घराची झडती सुरू केली होती.
चावला यांनी न्यायालयात धाव घेण्यासाठी संधी मागितली होती. चावला यांनी न्यायालयात पैसे जमा करण्याची परवानगी मागणारा अर्ज दाखल केला होता. परवानगी मिळताच त्यांनी ५० लाखांचा डीडी न्यायालयात जमा केला. व्याजाच्या पैशाच्यासंदर्भात १९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
अविनाश भुते यांनीही न्यायालयात वर्षभर ९ कोटी ५० लाख रुपये भरण्याबाबतचा अर्ज केला असून, या अर्जावरही १९ रोजी सुनावणी होणार आहे. तर विनय वासनकर याच्या जामीन अर्जावर ११ सप्टेंबर रोजी निर्णय होणार आहे. न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे तर चावला यांच्यावतीने अॅड. जे.एम. गांधी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)