मैत्रिणीशी गप्पा.. धम्माल मस्ती

By Admin | Updated: June 18, 2014 01:34 IST2014-06-18T01:34:34+5:302014-06-18T01:34:34+5:30

दहावीत असताना गाणे गुणगुणणे, मस्ती करणे, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणे म्हणजे अभ्यासावरचे लक्षच उडणार. केवळ अभ्यासाचाच विचार करायला हवा, अशीही सामान्यत: धारणा आहे.

Chat with girlfriends .. dhammal fun | मैत्रिणीशी गप्पा.. धम्माल मस्ती

मैत्रिणीशी गप्पा.. धम्माल मस्ती

मैत्रीच्या अनुबंधातून राघवी आणि समीक्षा झाल्या टॉपर
राजेश पाणूरकर-  नागपूर
दहावीत असताना गाणे गुणगुणणे, मस्ती करणे, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणे म्हणजे अभ्यासावरचे लक्षच उडणार. केवळ अभ्यासाचाच विचार करायला हवा, अशीही सामान्यत: धारणा आहे. पण दोन मैत्रिणींनी धम्माल मस्ती केली, टी. व्ही, सिनेमा पाहिला आणि अभ्यासाच्या वेळी मात्र दोघींनीही मिळून अभ्यास केला. आज त्या दोघीही जवळपास सारख्याच गुणांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
राघवी रवींद्र दोरखंडे आणि समीक्षा धोटे या दोन जिवाभावाच्या मैत्रिणी. दोघीही तेजस्विनी विद्या मंदिरात एकत्र शिकल्या. एकाच शिकवणी वर्गात त्या होत्या. पण दहावीची परीक्षा देताना त्यांनी आयुष्यात फारसे बदल केले नाही. आपापल्या स्वभावाप्रमाणे मोकळेपणाने त्यांनी आवडत्या बाबींनाही वेळ दिला. अनेकांना वाटायचे या मुली दहावीत आहेत पण अभ्यास फारसा गंभीरपणे घेत नाहीत. दोघीही एकत्र अभ्यास करायच्या आणि त्याशिवाय फोनवर परस्परांशी बोलायच्या. पण फोनवरही त्यांची चर्चा मात्र अभ्यासाच्या एखाद्या मुद्यावर व्हायची. सगळी मस्ती करताना आणि धम्माल करतानाही अभ्यासाच्या वेळात मात्र त्यांनी गंभीरपपणे अभ्यास केला. त्यात राघवीला ९७.६० तर समीक्षाला ९७. ८० टक्के गुण मिळाले आहेत. कदाचित आम्ही दोघींनी आमच्या आवडत्या गोष्टी एकत्रित एन्जॉय केल्या त्यामुळेच वर्षभर आम्ही रिलॅक्स राहिलो. अभ्यासाचे खूप टेन्शन घेतले तर त्याचाही ताण मनावर येतो. त्यापेक्षा आपले बेस्ट करण्याचा प्रयत्न होता.
राघवी सध्या शास्त्रीय संगीत शिकते आहे. ती उत्तम गाते तर समीक्षाला नृत्य आवडते. आम्ही दोघीही खूप धम्माल करायचो. अभ्यासाचे दोन तास वगळता फार ताण घेतला नाही. त्यामुळे सतत आनंदी होतो. अनेकांना वाटायचे या दोघी हुशार आहेत पण परीक्षेत काही खरे नाही. पण तसे नव्हते. खूप ताण न घेता आमचे बेस्ट करण्यासाठी आमचा प्रयत्न होताच. गुणांच्या टक्केवारीच्या शर्यतीत न पडता भविष्यातही सर्वाधिक चांगले, उत्कृष्ट करण्याचे आम्ही ठरविले आहे. यानंतर राघवी दोरखंडेला डॉक्टर व्हायचे आहे.
समीक्षालाही वैद्यकीय क्षेत्रातच भविष्य घडवायचे आहे. संगीताची आणि नृत्याची आवड असल्याने कधी अभ्यासाचा, इतरांच्या बोलण्याचा ताण आला तरी आम्ही आमच्या छंदामुळे एकदम रिलॅक्स व्हायचो. या यशाने आमची मैत्री अधिकच घट्ट झाली, असे दोघेही म्हणाल्या. डॉक्टर व्हायचे आहे पण त्यात आम्हा दोघींचीही एक दृष्टी आहे. जेथे आरोग्य सेवांची नितांत गरज आहे, अशा ठिकाणी आमच्या सेवा गरीब आणि गरजूंना देण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यांचे हे विधान त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव देणारे आहे. याशिवाय अभ्यासाचा अतिरिक्त ताण न घेताही चांगले यश संपादन करता येऊ शकते, याची प्रेरणाही या दोन मैत्रिणींनी दिली आहे.
हे यश अनपेक्षित
राघवी म्हणाली, हे यश अनपेक्षित आहे. इतके मार्क्स मिळतील असे वाटले नाही. तर समीक्षालाही तेच वाटते आहे. विशेष म्हणजे आम्ही दोघींनीही सायंकाळी फक्त दोन तास नियमाने अभ्यास करायचे, असे ठरविले होते. त्याप्रमाणेच अभ्यास केला. दोन तासाच्यावर अभ्यास केला नाही. पण आम्हा दोघींनाही मिळालेल्या गुणांनी समाधान वाटते आहे.

Web Title: Chat with girlfriends .. dhammal fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.