पाठलाग करुन कुख्यात साखळीचोराच्या आवळल्या मुसक्या
By Admin | Updated: March 14, 2017 15:38 IST2017-03-14T15:38:45+5:302017-03-14T15:38:45+5:30
मध्य प्रदेशातील कुख्यात सोनसाखळी चोर सोनू याचा चक्क तीन किलोमीटर पाठलाग करून एका पोलीस शिपायाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पाठलाग करुन कुख्यात साखळीचोराच्या आवळल्या मुसक्या
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - शस्त्राच्या धाकावर लुटमार करून पळून जाणारा मध्य प्रदेशातील कुख्यात सोनसाखळी चोर सोनू उर्फ प्रितपालसिंग जसवंतसिंग कलसी (वय ४०) याचा चक्क तीन किलोमीटर पाठलाग करून एका पोलीस शिपायाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. किशोर धोटे असे या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचा-याचे नाव असून, तो सदर पोलीस ठाण्यात शिपायी म्हणून सेवारत आहे.
केंद्रीय बांधकाम विभागाच्या सिव्हील लाईनमधील बंगल्यात राहणा-या अश्विनी पुरुषोत्तम पाततावणे (वय २७) त्यांच्या बहिणीसोबत सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता सदरमधून जात होत्या. अश्विनी मागे बसल्या होत्या तर त्यांची बहिणी दुचाकी चालवित होती. पागलखाना चौकाजवळ अचानक मागून मोटरसायलवर आलेल्या कुख्यात सोनू कलसीने चाकूसारख्या टोकदार शस्त्राने जखम करून अश्विनी यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढून घेण्याचा प्रयत्न केला. नोकदार शस्त्राची जखम झाल्यामुळे अश्विनी ओरडल्या. त्यामुळे बंदोबस्तावर असलेले पोलीस शिपायी किशोर धोटे यांचे तिकडे लक्ष गेले. त्यांनी तिकडे धाव घेताच आरोपी सोनू कलसी धोकादायक पद्धतीने वाहनचालवून पळू लागला. धोटे यांनी त्याचा तीन किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग केला आणि आरोपी सोनू कलसीच्या मुसक्या आवळल्या. अश्विनी पानतावणे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
शिपायी धोटेंचा सत्कार
कुख्यात सोनू कलसी हा मध्यप्रदेशातील जोहारटोली (होशंगाबाद) येथील संजयनगरातील रहिवासी आहे. तो सोनसाखळी चोर म्हणून कुख्यात आहे. विविध शहरात मोटरसायकलने सावज हेरून तो साखळी चोरतो आणि पळून जातो. अनेक राज्यातील पोलिसांना तो हवा आहे. त्याच्याविरुद्ध एकट्या नागपूर शहरात विविध पोलीस ठाण्यात ४० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. गुन्हा केल्यानंतर त्याचा लगेच पाठलाग करून त्याच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी बजावणारे पोलीस शिपायी धोटे यांचे धाडस आणि कर्तबगारी माहित पडताच सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी धोटेंना 2 हजार रुपयांचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. अन्य अधिका-यांनीही त्यांची प्रशंसा केली आहे.