चार्टर्ड अकाऊंटंट आयकर विभागाचे ‘आधारस्तंभ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 19:19 IST2018-09-25T19:18:17+5:302018-09-25T19:19:32+5:30
चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाने (आयसीएआय) केलेली प्रगती महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय आहे. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीने देशातील कर यंत्रणेची कार्यप्रणाली सुलभ करण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंटच्या प्रयत्नांना मान्यता दिली असून ते आयकर विभागाचे आधारस्तंभ असल्याची भावना प्रधान मुख्य आयकर आयुक्त आशा अग्रवाल यांनी व्यक्त केली.

चार्टर्ड अकाऊंटंट आयकर विभागाचे ‘आधारस्तंभ’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाने (आयसीएआय) केलेली प्रगती महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय आहे. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीने देशातील कर यंत्रणेची कार्यप्रणाली सुलभ करण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंटच्या प्रयत्नांना मान्यता दिली असून ते आयकर विभागाचे आधारस्तंभ असल्याची भावना प्रधान मुख्य आयकर आयुक्त आशा अग्रवाल यांनी व्यक्त केली.
‘आयसीएआय’च्या नागपूर शाखेच्या वतीने नवनिर्वाचित नागपूर विभागाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आशा अग्रवाल यांचा आयकर भवनात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष उमंग अग्रवाल, आयसीएआयच्या अकाऊंटिंग फॉर लोकल बॉडीचे सदस्य सीए जुल्फेश शाह, सीए सुरेन दुरगकर, सीए किरीट कल्याणी, सीए साकेत बागडिया, सीए संदीप जोतवानी, सीए संजय अग्रवाल आणि सीए विजय अग्रवाल उपस्थित होते.
सीएंशी संवाद साधताना अग्रवाल म्हणाल्या, विदर्भात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात असून विकासाच्या प्रचंड संधी आहेत. देशाचे मुख्य लॉजिस्टिक हब म्हणून पुढे येत आहे. विदर्भात करदाते कसे वाढतील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. देश हा त्यातील क्षेत्रामुळे मजबूत किंवा कमकुवत नसतो. मुख्यत्वे अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते. नागपुरात गेल्या दोन दशकांपासून बदल दिसून येत आहे. पण विकासाचे प्रतिबिंब महसूल संग्रहणात दिसून येत नाही. थेट करांसह अर्थव्यवस्थेचा विकास हा वाढत्या अर्थव्यवस्थेचे एक निरोगी चिन्ह आहे. तंत्रज्ञानाने सरकारी कार्यालयातील व्यवहाराचा मागोवा घेणे शक्य केले आहे. करदात्यांना भविष्यात आयकरासंदर्भात अडचणी टाळण्यासाठी सीएंनी विविध त्रुटी आणि अडचणींसंदर्भात करदात्यांना शिक्षित करावे, असे आवाहन आशा अग्रवाल यांनी केले.
प्रारंभी सीए उमंग अग्रवाल यांनी आशा अग्रवाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि संपूर्ण सीएंच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. उमंग अग्रवाल म्हणाले, काही दृष्टीने व्यावसायिकांना विभागाकडून मदतीची गरज आहे. ट्रस्टच्या समस्या सोडविण्याठी नागपुरात पूर्णवेळ आयकर आयुक्ताची गरज आहे. या भागातील जास्तीत जास्त ट्रस्ट आयकराच्या टप्प्यात आल्या आहेत. भविष्यात प्रधान मुख्य आयकर आयुक्तांचा सीएंसोबत नियमित संवाद असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शाह यांनी आयकर विभागासोबत अनुभव सांगितले. आयसीएआय आणि आयकर विभाग हे एक कुटुंब असून एकमेकांचे सहकार्य आणि आदर अपेक्षित आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आशा अग्रवाल यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.