चार्टर्ड अकाउंटंट हे राष्ट्र निर्माते

By Admin | Updated: July 14, 2015 03:03 IST2015-07-14T03:03:12+5:302015-07-14T03:03:12+5:30

गुंतवणूक असो वा करविषयक सल्ला उद्योजकांना कोणतेही ठोस निर्णय चार्टर्ड अकाऊन्टंटविना घेणे शक्य नाही. त्यांच्या

Chartered Accountant is the National Producer | चार्टर्ड अकाउंटंट हे राष्ट्र निर्माते

चार्टर्ड अकाउंटंट हे राष्ट्र निर्माते

देवेंद्र दर्डा यांचे प्रतिपादन : सीए विद्यार्थ्यांची राष्ट्रीय परिषद
नागपूर : गुंतवणूक असो वा करविषयक सल्ला उद्योजकांना कोणतेही ठोस निर्णय चार्टर्ड अकाऊन्टंटविना घेणे शक्य नाही. त्यांच्या सल्ल्यामुळेच रोजगार निर्मिती होते आणि देशाला कर स्वरूपात महसूल मिळतो. सीए कॉर्पोरेट भारताचा कणा असून राष्ट्र निर्माते म्हणून त्यांची भूमिका मोलाची असल्याचे प्रतिपादन लोकमत मीडिया समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी येथे केले.
इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊन्टंट आॅफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम विभागांतर्गत कार्यरत नागपूर सीए शाखेच्या वेस्टर्न इंडिया सीए विद्यार्थी असोसिएशन (डब्ल्यूसीएएसए) अर्थात ‘विकासा’च्या वतीने उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमए सभागृहात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून देवेंद्र दर्डा बोलत होते.
समारंभात मंचावर आयसीएआयच्या बोर्ड आॅफ स्टडिजचे उपाध्यक्ष नीलेश विकमसी, आयसीएआयचे माजी अध्यक्ष उत्तमप्रकाश अग्रवाल, ‘विकासा’ चेअरमन हार्दिक शाह, विभागीय परिषदेचे सदस्य जुल्फेश शाह, नागपूर शाखेच्या अध्यक्षा कीर्ती अग्रवाल, ‘विकासा’ नागपूरचे चेअरमन सुरेन दुरगकर, परिषदेचे समन्वयक स्वप्नील अग्रवाल, नागपूर सीए संस्थेचे सचिव संदीप जोतवानी, ‘विकासा’ नागपूरचे उपाध्यक्ष योगेश अमलानी आणि सचिव शिवानी सारडा उपस्थित होते.
आयसीएआयच्या बोर्ड आॅफ स्टडीजचे उपाध्यक्ष नीलेश विकमसी म्हणाले, सीए कोर्स हा जगात सर्वोत्तम आहे. यामध्ये तीन वर्षांपर्यंत अकॅडमिक ज्ञान आणि प्रॅक्टिकल प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांनी सीए परीक्षेत चिकाटीने यशस्वी व्हावे आणि अपयशाची शंका काढून टाकावी. अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी स्मार्ट फोनचा उपयोग करू नये, असे विकमसी म्हणाले. यावेळी उत्तमप्रकाश अग्रवाल, हार्दिक शाह, जुल्फेश शाह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्र जुल्फेश शाह यांच्या ‘शेरशायरी’ने गाजले. नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष कीर्ती अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. सीए परीक्षा उत्तीर्ण करण्यावर दुरगकर यांनी भाष्य केले.
संचालक ‘विकासा’ नागपूरचे विद्यार्थी बुधवानी व फत्तेपुरिया यांनी संचालन केले तर संदीप जोतवानी यांनी आभार मानले.
यावेळी सीए संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांमध्ये उमंग अग्रवाल, किरीट कल्याणी, स्वप्नील घाटे, अनिल भंडारी, सुबोध केडिया, रूकित बगडिया यांच्यासह देशभरातील सीएचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)

सीएंनी ‘नकार’ देण्यास शिकावे
सीए व्यवसायातील नीतीशास्त्राचे महत्त्व त्यांनी सांगितले. दर्डा म्हणाले, सीएंना नैतिक किंवा अवैध काम करण्यास सांगितले जाते, तेव्हा त्यांनी नकार देण्यास शिकले पाहिजे. अनैतिक लेखा व्यवहार आणि सत्यम कॉम्प्युटरसारखे देशात कॉर्पोरेट क्षेत्रात झालेले मोठे आर्थिक घोटाळे हे केवळ सीए नकार देण्यास अपयशी ठरल्यामुळेच घडले आहेत. त्यात लाखांपेक्षा जास्त शेअरधारकांना अर्थात सामान्यांना पैसा गमवावा लागला, असे दर्डा यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनो निराश होऊ नका
दर्डा यांनी विद्यार्थ्यांना सीए कोर्ससाठी चिकाटी न सोडण्याचे आवाहन केले. दर्डा म्हणाले, सीए परीक्षेत १० ते १२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात, ही सत्यता आहे. पण त्यामुळे विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये. जॉब मिळविण्यासाठी पदवी हा आधार होऊ शकत नाही, परंतु ज्ञान आणि अनुभव हेसुद्धा तुम्हाला जॉब देऊ शकतात. त्यामुळे सीए परीक्षा उत्तीर्ण न केलेल्या ८८ ते ९० टक्के विद्यार्थ्यांनाही रोजगाराच्या प्रचंड संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षा उत्तीर्ण करणे हे आव्हान असतानाही सीए विद्यार्थ्यांचे त्यांच्या निवडीबद्दल दर्डा यांनी अभिनंदन केले. परिषदेच्या ‘अनफोल्ड युवर विंग’ या थीमची त्यांनी प्रशंसा केली.

विशाल दृष्टी स्वीकारा
देवेंद्र दर्डा म्हणाले, सीए विद्यार्थ्यांनी विशाल दृष्टी स्वीकारावी, व्यावहारिक कौशल्याचा विकास करावा, ग्लोबल बिझनेससाठी महत्त्वाची ठरणारी इंग्रजी भाषा अस्खलित बोलणे शिकावे आणि व्यवसायाच्या आवश्यतेनुसार कौशल्याचा अवलंब करावा. सीए कोर्समध्ये एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थिनी असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. लोकमतचे ‘सखी मंच’ व्यासपीठ महिलांच्या उत्थानासाठी कार्य करते. राज्यातील अडीच लाखांपेक्षा जास्त महिला जुळल्या आहेत. महिलांच्या विकासासाठी लोकमत कार्यरत असल्याचे दर्डा म्हणाले.

चिकाटी व जिद्द महत्त्वाची
जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि चिकाटी महत्त्वाची असल्याचे देवेंद्र दर्डा यांनी सोदाहरण सांगितले. अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली येथे एका छोट्या आयटी कंपनीत उत्पादन विकास व्यवस्थापक (प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर) म्हणून नोकरी पत्करली. रिमोट नेटवर्क आॅपरेटिंग सेंटर, या कंपनीच्या उत्पादनाची माहिती डेल कॉर्पोरेशनला करून देण्यासाठी अनेकदा प्रयत्न केला. डेलच्या सीईओला भेटण्यासाठी तीन महिने केलेले अथक प्रयत्न अपयशी ठरले. त्यावेळी बॉसने मला त्रास दिला. पण हार न मानता डेलशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. दोन परिच्छेदाचा ई-मेल तयार केला आणि थेट डेल कॉर्पोरेशनचे मुख्य मायकल डेल यांना पाठविला. त्यावेळी त्यांचा ई-मेल मला माहीत नव्हता, पण त्यांच्या नावाशी मिळत्याजुळत्या आयडीवर सतत ई-मेल पाठविणे सुरूच ठेवले. अखेर ई-मेल त्यांना मिळाला. एक आठवड्यानंतर डेलचे सीईओ यांनी मला बोलविले आणि २० दशलक्ष डॉलरचा कंपनीशी करार केला. चिकाटी आणि जिद्दीने मला हे शक्य झाल्याचे दर्डा यांनी सांगितले. दर्डा यांचे अनुभव ऐकून विद्यार्थ्यांनी त्यांना उभे राहून अभिवादन केले. प्रश्नोत्तर सत्रात दर्डा यांनी दिलेल्या उत्तरांना विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

Web Title: Chartered Accountant is the National Producer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.