समर्पित कार्यकर्त्यांचे चरित्र समोर यावे
By Admin | Updated: October 10, 2016 02:29 IST2016-10-10T02:29:01+5:302016-10-10T02:29:01+5:30
आज भाजपा सत्तेत असली तरी या यशाचा पाया असंख्य कार्यकर्त्यांनी रचलेला आहे. जनसंघापासून सुरू

समर्पित कार्यकर्त्यांचे चरित्र समोर यावे
नागपूर : आज भाजपा सत्तेत असली तरी या यशाचा पाया असंख्य कार्यकर्त्यांनी रचलेला आहे. जनसंघापासून सुरू झालेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला. अनेकांनी आपल्या समर्पित वृत्तीने आदर्श प्रस्थापित केला. सुंदरलालजी राय हेदेखील त्यातीलच होते. अशा सेवाभावी कार्यकर्त्यांचे चरित्र समाजासमोर आणले पाहिजे, असे मत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केले. सुंदरलालजी राय जन्मशताब्दी समारोहाचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, अनुपम राय व डॉ. रुपा राय हे उपस्थित होते. पंडित दीनदयाल उपाध्याय व सुंदरलालजी राय यांच्या जन्मशताब्दीला रविवारपासून सुरुवात होत आहे. दोन्हीही नेत्यांचे कार्य समाजासाठी आजही प्रेरणादायी आहे. दोघांचेही आयुष्य कमी होते, पण काम मोठे होते. त्यामुळे आयुष्य किती जगले यापेक्षा कसे जगले याला महत्त्व असते, असे प्रतिपादन राम नाईक यांनी केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय व सुंदरलालजी यांच्या कार्यात साम्य आहे. संघर्षातून यांनी कामाला सुरुवात केली. प्रसंगी विरोध व उपहास यांचा सामना केला व जनसंघाचा पाया रचला. देशात ४५० राजकीय पक्ष आहेत. त्यातील ४४५ पक्ष कुठल्या ना कुठल्या कुटुंबाचे आहेत. विचारांवर आधारित व सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला मोठे करण्याचे काम याच समर्पित भावनेने केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सुंदरलाल राय यांच्या सारख्यांनी संघर्ष केला म्हणून आज आजचे सत्तेचे दिवस आम्हाला पहायला मिळाले. त्यांचा इतिहास नवीन पिढीसमोर समर्पक पद्धतीने आणण्याची आवश्यकता आहे. हा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय व सुंदरलालजी यांनी सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्र निर्माणासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. त्यांच्या कार्यांची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी जन्मशताब्दी समितीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल सोले यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर डॉ.रुपा राय यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
पंडित दीनदयाल उपाध्याय व सुंदरलालजी राय यांच्या जन्मशताब्दी सोहळ््याच्या उद््घाटनप्रसंगी विचार व्यक्त करताना उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक. मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर प्रवीण दटके, आ. अनिल सोले, डॉ. रुपा राय व अनुपम राय उपस्थित होते.