समाजाला समोर आणण्यासाठी बदल आवश्यक
By Admin | Updated: June 23, 2014 01:21 IST2014-06-23T01:21:18+5:302014-06-23T01:21:18+5:30
जैन समाजाला विविध क्षेत्रात समोर आणण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्यक आहे. यासाठी चालीरीतींना आधुनिक आणि समृद्ध बनविले पाहिजे. कुटुंबातील मुलांसोबत व्यवसाय किंवा व्यवहार करताना

समाजाला समोर आणण्यासाठी बदल आवश्यक
भारतीय जैन संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांचे मत
नागपूर : जैन समाजाला विविध क्षेत्रात समोर आणण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्यक आहे. यासाठी चालीरीतींना आधुनिक आणि समृद्ध बनविले पाहिजे. कुटुंबातील मुलांसोबत व्यवसाय किंवा व्यवहार करताना वैज्ञानिक आणि व्यावहारिक गोष्टी स्वीकारून पुढे गेले पाहिजे. ज्या प्रकारे काळ बदलत आहे त्या प्रमाणेच आपले कार्य केले पाहिजे, तेव्हाच एका चांगल्या समाजाची रचना केली जाऊ शकते, असे मत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी मांडले.
सामाजिक-शैक्षणिक आणि सेवाक्षेत्रात कार्यरत भारतीय जैन संघटनेद्वारे शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवर जनजागृती करण्यासाठी राष्ट्रव्यापी अभियान चालविण्यात आले. यात्रेदरम्यान विविध पाडाव पार करीत प्रफुल्ल पारख नागपुरात पोहचले. त्यांनी रविवारी रात्री वर्धमाननगरात जैन समाजाच्या सभेला संबोधित केले.
पारख म्हणाले, समाजातील वाढत्या आधुनिकीकरणासोबतच तरुण आणि मुलांसोबतच व्यवहारात पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. आईवडिलांनी मुलांसोबत मैत्रीचे नाते निर्माण केले पाहिजे. उदाहरणार्थ मुलांनी मोबाईलवरील गोष्टी सांगितल्या पाहिजे. तरुणी सुरक्षित राहाव्यात यासाठी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी समाजाच्या निवडक सदस्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. ज्या प्रकारे काळ बदलत आहे त्या मानाने येणाऱ्या पिढ्या आमच्या वर्तमानातील व्यवसाय स्वीकारणार नाहीत. त्यामुळे व्यापार आणि व्यवसायाचे आधुनिकीकरण होणे गरजेचे आहे. भारतीय जैन संघटनेने युवकांना आधुनिक व्यापार आणि व्यवसायाचे ज्ञान होण्यासाठी प्रशिक्षण योजना तयार केली आहे. यासाठी देशभरातील ५० युवकांची निवड करण्यात येणार आहे. त्यांचा देशातील ६० शहरांमध्ये दौरा केला जाणार आहे. देशातील आयआयएमच्या व्यापार व्यवसाय विभागाच्या प्रमुख प्राध्यापकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. विविध शहरातील आघाडीच्या व्यावसायिकांसोबत त्यांच्या मुलाखती होतील.
हे प्रशिक्षित युवक परत आल्यावर समाजातील लोकांना प्रशिक्षित करतील. त्यामुळे समाजातील व्यवसायिक साचा आधुनिक होईल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे राज्याचे अध्यक्ष पारस ओसवाल उपस्थित होते. (प्रतिनिधी)