महिलांप्रति सामाजिक मानसिकतेत बदल हवा
By Admin | Updated: February 10, 2015 00:47 IST2015-02-10T00:47:21+5:302015-02-10T00:47:21+5:30
महिलांवर अत्याचार होऊ नयेत याकरिता अनेक कायदे आहेत. परंतु तरीदेखील महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. केवळ कायदे बनवून महिला सुरक्षित होत नाहीत, तर त्यांच्याप्रती सामाजिक

महिलांप्रति सामाजिक मानसिकतेत बदल हवा
न्या. भूषण गवई : ‘जस्टा कॉझा’ विधी महोत्सवाचा समारोप
नागपूर : महिलांवर अत्याचार होऊ नयेत याकरिता अनेक कायदे आहेत. परंतु तरीदेखील महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. केवळ कायदे बनवून महिला सुरक्षित होत नाहीत, तर त्यांच्याप्रती सामाजिक मानसिकतेदेखील सकारात्मक बदल होणे आवश्यक आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी कॉलेजतर्फे आयोजित १३ व्या ‘जस्टा कॉझा’ या विधी महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.
विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, ‘बीसीयूडी’ (बोर्ड आॅफ कॉलेज अॅन्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेन्ट) संचालक डॉ.श्रीकांत कोमावार, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.प्रविणा खोब्रागडे हे उपस्थित होते. बालविवाह आणि सतीप्रथा यासारख्या चालीरीती बंद झाल्या असूनदेखील महिलांवर अद्यापही अत्याचार होत आहेत. आजही महिलांना दुय्यम स्थान देण्यात येते. महिलांना न्याय देण्यासाठी काही कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. महिला सुरक्षेप्रती वकिलांची भूमिका महत्त्वाची आहे. वकिली व्यवसायात पैसा कमावणे हे प्राथमिक ध्येय असले तरीही समाजाप्रती आपले दायित्व पार पाडतानाच महिला सुरक्षेकरिता त्यांनी योगदान द्यायलाच हवे असे आवाहन न्या.भूषण गवई यांनी केले.
‘जस्टा कॉझा’मध्ये तीन दिवसांत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. ‘मूट कोर्ट’ स्पर्धेत ख्रिस्त विधी कॉलेज बेंगळुरू तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत मुंबईच्या प्रवीण गांधी विधी कॉलेजला प्रथम पारितोषिक देण्यात आले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सोनिया कुंदनानी, दर्शन शहा, साहिल श्याम देवानी, मेधानी आर्या यांनी बाजी मारली. (प्रतिनिधी)