योगेश पांडे, नागपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूका लक्षात घेता भाजपने नागपूर शहर व नागपूर जिल्ह्यात नेतृत्वबदल केला आहे. शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्या कार्यकाळ संपायला अवधी असतानाच भाजपने माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. तर जिल्हा परिषदेचा किल्ला सर करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात प्रथमच दोन जिल्हयाध्यक्षांचा प्रयोग केला आहे. काटोल आणि रामटेक असे दोन विभाग करून तेथे अनुक्रमे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर कुंभारे आणि माजी सभापती आनंदराव राऊत यांना जिल्हाध्यक्ष केले आहे. भाजपच्या या खेळीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात लोकसभा व विधानसभेची निवडणूक लढविल्या गेली होती. मात्र त्यांच्या ऐवजी नवीन चेहऱ्याचा शोध सुरू होता. अनेक तरुण नावांवरदेखील भाजपकडून विचार झाला. मात्र मनपा निवडणूकीत भाजपची नस जाणणारा व शहराची चांगली ओळख असलेल्यालाच शहराध्यक्ष करण्यात यावे असे पक्षनेत्यांचे मत पडले. त्यातूनच तिवारी यांच्या नावावर एकमत झाले.
कोण आहेत दयाशंकर तिवारी?माजी महापौर दयाशंकर तिवारी हे चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. ते २०२१-२२ या कालावधीत शहराचे महापौरदेखील होते. १९९७ मध्ये ते गांधीबाग वॉर्डाचे नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून गेले. २००२ मध्ये बजेरिया, २०१२ व २०१७ मध्ये गांधीबाग येथून ते नगरसेवक झाले. त्यांनी मनपाचे स्थायी समिती अध्यक्षपद, सत्तापक्षनेते, नासुप्रचे विश्वस्त या जबाबदाऱ्यादेखील पार पाडल्या. पक्ष संघटनेतदेखील कामाचा त्यांना अनुभव आहे. १९८८ ते १९९१ या कालावधीत ते भाजयुमोचे शहराध्यक्ष होते. १९९५ मध्ये भाजपचे शहर मंत्री झाले. २००७ ते २०१० या कालावधीत प्रवक्तादेखील होते. याशिवाय शहरातील क्रीडा संघटना व सामाजिक संघटनांशीदेखील ते जुळले आहेत. उत्तम वक्ता अशी ओळख असलेल्या दयाशंकर तिवारी यांचा तळागाळात ‘कनेक्ट’ आहे. विशेष म्हणजे जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये ते सहजतेने वावरतात. त्यामुळेच भाजप नेत्यांनी त्यांच्या नावाला हिरवी झेंडी दाखविली.
ग्रामीणमध्ये भाजपचे मिशन जिल्हा परिषदलोकसभा निवडणूकीत भाजपला रामटेक मतदारसंघात मोठा फटका बसला होता. विधानसभेत भाजपने पाच जागा जिंकून पराभवाचे उट्टे काढले होते. मात्र जिल्हा परिषदेवर सत्ता आणण्यासाठी पूर्ण जिल्हा पिंजणे आवश्यक आहे. जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता एका व्यक्तीकडून हे शक्य नाही हे लक्षात घेऊनच भाजपने रामटेक व काटोल अशी विभागणी केली आहे. काटोल विभागात मनोहर कुंभारे यांना जिल्हाध्यक्ष बनविण्यात आले आहे. कॉंग्रेसचे माजी मंत्री सुनिल केदार यांचे एके काळी कट्टर समर्थक असलेले कुंभारे यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणूकीत आशीष देशमुख यांच्या प्रचारात कुंभारे सक्रिय होते व केदार यांच्या वर्चस्वाला मोडून काढत भाजपने झेंडा फडकविला होता. जिल्हा परिषदेत याची पुनरावृत्ती व्हावी यासाठीच कुंभारे यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे. दुसरीकडे माजी सभापती आनंदराव राऊत यांचा रामटेक व आजुबाजूच्या भागात चांगला कनेक्ट आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत असताना पक्षाने राऊत यांच्यावर विश्वास टाकला.
ग्रामीणमध्ये सहा विधानसभांचे विभाजनभाजपने संघटनात्मक दृष्ट्या नागपूर जिल्ह्याचे काटोल व रामटेक अशा दोन भागांत विभाजन केले आहे. काटोलमध्ये हिंगणा, काटोल व सावनेर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर रामटेक भागात रामटेक, उमरेड व कामठी या मतदारसंघाचा समावेश आहे.