नागपूर : सूर्याचा ताप विदर्भात पुन्हा एकदा वाढला आहे. नागपूरसह सहा जिल्ह्यांचा पारा ४२ अंशाच्या पार गेला आहे. चंद्रपूरमध्ये तापमानाने पुन्हा उसळी घेतली असून, ४४ अंशासह देशात सर्वांत हाॅट शहर ठरले. जगातील पहिल्या दहा उष्ण शहरांमध्येही चंद्रपूर समाविष्ट आहे.
दाेन दिवस ढगाळ वातावरणामुळे घटलेल्या पाऱ्याने शुक्रवारपासून पुन्हा उसळी घेतली. एप्रिलची उष्ण लाट पुन्हा सक्रिय हाेत असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. २४ तासांत तापमान १ अंशाने वाढले असून, सरासरीपेक्षा २ अंशांची वाढ झाली आहे. नागपुरात शनिवारी ४२.८ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. उन्हाच्या झळा दिवसभर नागरिकांना बसल्या. त्यामुळे काहीशी चिडचिड हाेत आहे. चंद्रपूरकरांची नेहमीप्रमाणे अंगाची लाही हाेत आहे.
विदर्भातील इतर शहरांत आज उन्हाच्या झळांनी हैराण केले. अकाेला ४३.७ अंशावर पाेहोचला. याशिवाय वर्धा ४३, ब्रह्मपुरी ४३.२, अमरावती ४२.२, यवतमाळ ४२.५, गाेंदिया ४२, तर गडचिराेली काही अंशी वाढून ४०.६ अंशावर पाेहोचले. रात्रीच्या किमान तापमानात २४ तासांत घसरण झाली असली तरी सरासरी तापमान १ ते २ अंशांनी अधिक आहे. नागपूरचे किमान तापमान २.७ अंशांनी घसरून २१.६ अंश नाेंदविण्यात आले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भवासीयांना पुढचे चार दिवस उष्ण लाटांचा सामना करावा लागणार आहे. पारा आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वेधशाळेने केले आहे.