मेट्रोेसाठी ‘सत्कार’ची जमीन घेण्याच्या कारवाईस आव्हान
By Admin | Updated: December 9, 2015 03:25 IST2015-12-09T03:25:53+5:302015-12-09T03:25:53+5:30
मेट्रो रेल्वेसाठी कस्तूरचंद पार्कजवळच्या सत्कार गेस्ट हाऊसची जमीन ताब्यात घेण्यात आली आहे.

मेट्रोेसाठी ‘सत्कार’ची जमीन घेण्याच्या कारवाईस आव्हान
हायकोर्टात याचिका : मेट्रो रेल्वे कार्पोरेशनला नोटीस
नागपूर : मेट्रो रेल्वेसाठी कस्तूरचंद पार्कजवळच्या सत्कार गेस्ट हाऊसची जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. या कारवाईविरुद्ध आॅर्बिट मोटेल्स अॅन्ड सन्स कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. सत्कार गेस्ट हाऊस ९३४३ चौरस मीटर जमिनीवर (सर्वे क्र. १६९) उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने १७ जुलै १९९५ रोजी लीज करार करून ही जमीन याचिकाकर्त्यांना दिली होती. तेव्हापासून या जमिनीवर याचिकाकर्त्यांचा ताबा आहे. २७ मे २००२ रोजी पर्यटन महामंडळाने याचिकाकर्त्यांना लीज करार रद्द करण्यासंदर्भात कायदेशीर नोटीस पाठवली. या नोटीसला याचिकाकर्त्यांनी दिवाणी न्यायालयात आव्हान दिले आहे. हा दावा प्रलंबित आहे. दरम्यान, २१ नोव्हेंबर २०१५ रोजी सायंकाळी नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी अवैधपणे गेस्ट हाऊसच्या परिसरात प्रवेश करून ३००० चौरस फूट जागेवर बळजबरीने अतिक्रमण केले. नैसर्गिक न्यायतत्त्व व कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता ही कारवाई करण्यात आली. यामुळे याचिकाकर्त्यांच्या अधिकारांची पायमल्ली झाली, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व प्रसन्न वराळे यांनी मंगळवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व राज्य शासनाला नोटीस बजावून ७ जानेवारी २०१६ पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. तसेच, याप्रकरणी यथास्थिती ठेवण्यास सांगितले. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ वकील आनंद जयस्वाल यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)