‘चक्का चोर’ सापडले

By Admin | Updated: November 26, 2015 03:25 IST2015-11-26T03:25:13+5:302015-11-26T03:25:13+5:30

उपराजधानीत चक्काचोरांची टोळी सक्रिय झाली असून उभ्या वाहनाचे अख्खे चाकच चोरटे काढून नेत आहेत.

'Chakka thief' was found | ‘चक्का चोर’ सापडले

‘चक्का चोर’ सापडले

अंबाझरी पोलिसांची कारवाई : दोघांना अटक
नागपूर : उपराजधानीत चक्काचोरांची टोळी सक्रिय झाली असून उभ्या वाहनाचे अख्खे चाकच चोरटे काढून नेत आहेत. असेच दोन चक्काचोर अंबाझरी पोलिसांच्या हाती लागले आहेत. ओंकार धनराज सूर्यवंशी (२२) रा. सुदामनगरी आणि विजय मुन्ना मिश्रा (२१) रा. अंबाझरी टेकडी असे या चक्का चोरांचे नाव आहे. मंगळवारी रात्री गस्तीवरील पोलिसांना आरोपी संदिग्ध अवस्थेत फिरताना सापडले. त्यांना पोलिसांनी थांबवून विचारपूस केली तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्यांनी टायर चोरल्याची कबुली दिली.
पवनी भंडारा येथील समीक्षा नागुलकर (२०) या विद्यार्थिनीने कॅटच्या परीक्षेसाठी नागपुरात शिकवणी वर्ग लावला आहे. यासाठी ती अंबाझरी येथील श्रीकृष्णा अपार्टंमेटमध्ये भाड्याने राहत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या अपार्टमेंट बाहेर पार्क केलेल्या गाडीतील चाक चोरट्यांनी काढून नेले. यासंदर्भात तिने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मंगळवारी गस्तीदरम्यान पोलिसांना हे दोघेही अंबाझरी परिसरात संशयास्पदरीत्या फिरत होते. ते चक्का चोरीच्या प्रयत्नातच होते. शहरात चक्का चोरी करणारी टोळी सक्रिय आहे. यासंदर्भात लोकमतने बुधवारच्याच अंकात वृत्त प्रकाशित करून पोलिसांचे लक्षही वेधले आहे. लकडगंज परिसरात राहणाऱ्या मल्लिका लांजे या महिलेच्या ह्युंडई आय १० या कारचे टायर ट्युबसह अख्खे चाकच चोरीला गेले. सोमवारी रात्री ही घटना घडली. त्याचप्रकारे शांतिनगर येथील गुलाबचंद सुराणा यांच्या ह्युंडई आय २० ग्रॅण्ड कारची तीन चाके चोरट्यांनी लंपास केली. त्यांनी सुद्धा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. चक्का चोरीसह कारचे लोगो सुद्धा चोरीला जात आहे. अंबाझरीच्या घटनेमुळे ही बाब स्पष्ट झाली असून या चोरट्यांकडून या टोळीतील इतर सदस्यांचीही माहिती पुढे येऊ शकते.(प्रतिनिधी)

Web Title: 'Chakka thief' was found