पत्नीची केस लढणाऱ्या वकिलावर चाकूहल्ला
By Admin | Updated: January 10, 2017 02:01 IST2017-01-10T02:01:34+5:302017-01-10T02:01:34+5:30
पोटगीची मागणी करून कोर्टात गेलेल्या पत्नीला मदत करणाऱ्या वकिलावर एका आरोपीने चाकूहल्ला केला.

पत्नीची केस लढणाऱ्या वकिलावर चाकूहल्ला
वकिलाची पत्नीही जखमी : हुडकेश्वरमध्ये दहशत
नागपूर : पोटगीची मागणी करून कोर्टात गेलेल्या पत्नीला मदत करणाऱ्या वकिलावर एका आरोपीने चाकूहल्ला केला. जखमी पत्नीच्या मदतीला धावलेल्या वकिलाच्या पत्नीवरही आरोपीने चाकूचा वार केला. या हल्ल्यात वकील आणि त्यांची पत्नी जबर जखमी झाले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.
संजय रामभाऊ पिंगळे (वय २९) आणि अश्विनी संजय पिंगळे अशी जखमी दाम्पत्याची नावे आहेत. आरोपी सूरज विनायक केळझरकर (वय २३) उमरेडचा (जि. नागपूर) रहिवासी आहे. त्याचे श्वेता नामक तरुणीसोबत लग्न झाले होते. व्यक्तिगत कारणामुळे पटेनासे झाल्याने त्याची पत्नी श्वेता हिने सूरजच्या विरोधात काही दिवसांपूर्वी पोलिसात आणि कोर्टात धाव घेतली. त्यांचे प्रकरण कोर्टात नेण्यासाठी वकील संजय पिंगळे यांनी मदत केल्याची माहिती सूरजला मिळाली. त्यामुळे पिंगळे यांनी तिला मदत करू नये, अशी सूरजची भावना होती. त्याला दाद न मिळाल्यामुळे सूरज संतापला. रविवारी रात्री ११ च्या सुमारास तो आपल्या एका साथीदारासह हुडकेश्वरमधील चक्रपाणीनगरात राहणारे वकील संजय पिंगळे यांच्या घरात शिरला. ‘तुम्ही श्वेताला मदत का करता’ , अशी त्याने विचारणा केली. आपला व्यवसाय असल्यामुळे आपण तिची केस लढतो. आपण नाही लढलो तर ती दुसऱ्या कुणा वकिलाकडे जाईल, असेही पिंगळेने आरोपीच्या लक्षात आणून दिले. मात्र, ते समजून घेण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या सूरजने पिंगळेशी वाद घातला आणि त्यांच्या तोंडावर, पोटावर चाकूचे वार केले.पिंगळे यांची पत्नी अश्विनी मदतीला धावल्या असता आरोपीने त्यांच्यावरही चाकूने वार केला. (प्रतिनिधी)
आरोपींची शोधाशोध
जखमी पिंगळे दाम्पत्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. वकिलावर हल्ला झाल्याची माहिती कळताच हुडकेश्वर पोलिसांनी धावपळ केली. पिंगळे यांच्या तक्रारीवरून आरोपी सूरज केळझरकर आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. मध्यरात्री आरोपीच्या शोधासाठी त्याचे गावही गाठले. मात्र, आरोपी मिळाले नाही. वृत्त लिहिस्तोवर आरोपीच्या दुसऱ्या साथीदाराचे नाव स्पष्ट झाले नव्हते.