‘चेन स्नॅचर्स’ला कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2016 02:37 IST2016-05-31T02:37:47+5:302016-05-31T02:37:47+5:30

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविण्यात कुख्यात असलेल्या दोन ‘चेन स्नॅचर’ पठाण बंधूंना मोक्का विशेष

Chain Snouts imprisoned | ‘चेन स्नॅचर्स’ला कारावास

‘चेन स्नॅचर्स’ला कारावास

नागपूर : महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविण्यात कुख्यात असलेल्या दोन ‘चेन स्नॅचर’ पठाण बंधूंना मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी १० लाख २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. चेन स्नॅचर टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गतच्या (मोक्का) कारवाईस उपराजधानीतून सुरुवात झाली होती. मोक्कांतर्गत चेन स्नॅचर टोळीच्या म्होरक्यासह दोघांना झालेली ही राज्यातील पहिलीच शिक्षा होय. २० लाख ४ हजार रुपये दंडाच्या रकमेतून ३ लाख रुपये फिर्यादी महिलेला देण्यात यावे, असा आदेशही न्यायालयाने केला. या खटल्यातून तीन आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
टोळीचा म्होरक्या मंजूरखान जमीलखान पठाण (३०) रा. वनदेवीनगर पोलीस ठाणे यशोधरानगर आणि त्याचा भाऊ मोहम्मद सानू ऊर्फ मुस्तफा जमीलखान पठाण (२८) रा. टिपू सुलतान चौक पोलीस ठाणे पाचपावली, अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. याच टोळीतील सदस्य मोहम्मद तनवीर ऊर्फ जाहीरा इक्बाल अजहर रा. आजरीमाजरी, सोनार सुरेंद्र बापूराव बानाबाकोडे रा. शारदा चौक नंदनवन आणि मिलिंद ऊर्फ बाल्या दयाराम मेश्राम रा. खोलदोडा भिवापूर, अशी निर्दोष सुटका झालेल्यांची नावे आहेत.

अशी आहे शिक्षा
४गुन्हा सिद्ध होऊन मंजूरखान आणि सानूखान यांना भादंविच्या ३९४ कलमांतर्गत १० वर्षे सश्रम कारावास, प्रत्येकी २ हजार रुपये दंड, मोक्काच्या ३ (१) (२) अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ लाख रुपये दंड, ३(४) कलमांतर्गत १० वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ लाख रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्र भोगाव्या लागतील.
मानसिक आघाताने दिली नव्हती साक्ष
४भल्या सकाळी हल्ला करून सोन्याची चेन हिसकावून नेण्याच्या घटनेमुळे फिर्यादी शोभादेवी सारंगी यांच्यावर मानसिक आघात झाला होता. हृदयाचा जबर धक्का बसल्याने त्या दुबई येथील मुलाकडे उपचारासाठी निघून गेल्या होत्या. मानसिक आघातामुळेच त्या साक्ष देण्यासाठीही नागपुरात आल्या नाही.

Web Title: Chain Snouts imprisoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.