शहर स्वच्छतेचा ‘सीजीएस’मंत्र

By Admin | Updated: January 3, 2015 02:40 IST2015-01-03T02:40:41+5:302015-01-03T02:40:41+5:30

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून विभागातील नगरपालिका पातळीवरील शहरे स्वच्छ करण्याचा संकल्प आयुक्त कार्यालयाने केला असून...

'CGS' machine of cleanliness of the city | शहर स्वच्छतेचा ‘सीजीएस’मंत्र

शहर स्वच्छतेचा ‘सीजीएस’मंत्र

नागपूर : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून विभागातील नगरपालिका पातळीवरील शहरे स्वच्छ करण्याचा संकल्प आयुक्त कार्यालयाने केला असून त्यासाठी नवीन वर्षात ‘सीजीएस’ (क्लीन ग्रीन सिटी/ स्वच्छ हिरवे शहर) ही संकल्पना राबविण्यावर भर दिला जाणार आहे.
विभागीय उपायुक्त आप्पासाहेब धुळाज यांनी ही माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबरपासून स्वच्छ भारत अभियान देशपातळीवर राबविण्याचे आवाहन केले. त्याला राज्यातही विविध स्वंयसेवी संस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. देशाचा पंतप्रधान हातात झाडून घेऊन स्वच्छतेबद्दल सांगतो याला एक वेगळेच महत्त्व आहे. त्यामुळेच त्यापासून प्रेरणा घेऊन नगरपंचायत आणि नगरपालिका पातळीवरील शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून नवीन वर्षात काही उपक्रम हाती घेण्याचा विचार असून त्यात ‘सीजीएस’ या संकल्पनेचा समावेश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
छोट्या नगर पंचायती आणि नगरपालिकांच्या ठिकाणी शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, दवाखाने आणि इतरही सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून स्वच्छतेचे प्रमाणपत्र दिले जाईल व ते ठळकपणे संबंधित ठिकाणी लावले जातील. त्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी हा यामागचा उद्देश असल्याचे धुळाज यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे शहर स्वच्छ, हिरवे आणि सुरक्षित ठेवणाऱ्या नगरपालिका-नगरपंचायतींना प्रमाणपत्र देण्याचा विचारही प्रशासनाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील विविध नगरपालिका-नगर पंचायत शहरातील सरासरी सहा हजारावर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता अभियानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचाही फायदा या उपक्रमाला होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'CGS' machine of cleanliness of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.