केंद्रशासनाच्या उपक्रमाला विदर्भात ‘खो’!
By Admin | Updated: October 13, 2016 02:58 IST2016-10-13T02:58:44+5:302016-10-13T02:58:44+5:30
पश्चिम व-हाडात देशी गायींचे कृत्रीम रेतन कार्यक्रम झालाच नसल्यामुळे पशुपालकांमध्ये नाराजी.

केंद्रशासनाच्या उपक्रमाला विदर्भात ‘खो’!
सुनील काकडे
वाशिम, दि. १२- आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात देशी व गावरान गायींची संख्या वाढावी, यासाठी गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबरला ह्यगो कृत्रीम गर्भदानह्ण हा उपक्रम राबाविण्याचे केंद्रशासनाचे निर्देश होते. मात्र, विदर्भातील एकाही जिल्ह्यात नियोजित तारखेला हा उपक्रम झालाच नाही. यामुळे पशुपालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.
शुद्ध देशी व गावरान गायींची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखून २ ऑक्टोबर या एकाच दिवशी देशभरात २ लाख गायींचे कृत्रीम गर्भदान घडवून आणण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले होते. त्यानुसार, महाराष्ट्राच्या वाट्याला १0 हजार गायींचे उद्दीष्ट आले होते. तसेच जिल्हानिहाय ३00 गायींवर हा प्रयोग करावयाचा होता. त्यासाठी मात्र २२ सप्टेंबर, २९ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर असे तीन दिवस कृत्रीम गर्भधारणेकरिता आवश्यक असणारे ह्यइंजेक्शन्सह्ण गायींना देणे क्रमप्राप्त होते. मात्र, एकाही जिल्ह्यतील पशूसंवर्धन विभागाला नियोजित तारखांना ह्यइंजेक्शन्सह्णचा पुरवठाच झाला नाही. परिणामी, हा उपक्रम सपशेल अपयशी ठरला.
- अनैसर्गिक पद्धतीने गर्भदान केल्यास गायींच्या गर्भधारणा क्षमतेवर भविष्यात गंभीर परिणाम जाणवू शकतात. ही बाब लक्षात घेवून एकाच दिवशी हा उपक्रम राबविण्याऐवजी गायींच्या नैसर्गिक ऋतुचक्राप्रमाणे आगामी तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने हा कार्यक्रम राबविण्याच्या केंद्रशासनाच्या सूचना आहेत. त्यामुळेच राज्यातील कुठल्याच जिल्ह्यात २ ऑक्टोबरला हा उपक्रम राबविण्यात आलेला नाही.
- एच.डी. गायकवाड,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
महाराष्ट्र पशूधन विकास मंडळ