केंद्रीय नागरी सेवा परीक्षा २८ मे रोजी; पंधरा हजार परीक्षार्थी सहभागी होणार
By आनंद डेकाटे | Updated: May 25, 2023 18:36 IST2023-05-25T18:36:22+5:302023-05-25T18:36:45+5:30
Nagpur News संघ लोकसेवा आयोगामार्फत आयोजित नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२३ ही रविवार २८ मे रोजी नागपूर येथील ४० उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेला यंदा नागपूर केंद्रावरून एकूण १४,८८१ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.

केंद्रीय नागरी सेवा परीक्षा २८ मे रोजी; पंधरा हजार परीक्षार्थी सहभागी होणार
आनंद डेकाटे
नागपूर : संघ लोकसेवा आयोगामार्फत आयोजित नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२३ ही रविवार २८ मे रोजी नागपूर येथील ४० उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेला यंदा नागपूर केंद्रावरून एकूण १४,८८१ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.
पहिल्या सत्रात सकाळी ९.३० से ११.३० व दुसऱ्या सत्रात दुपारी २.३० ते ४.३० वाजेपर्यंत ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या यशस्वी आयोजनाकरीता सर्व ४० उपकेंद्रावर पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय संघ लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार परीक्षा सुरळीत पार होण्याकरीता प्रत्येक उपकेंद्राकरीता १ स्थानिक निरीक्षण अधिकारी असे एकूण ४० स्थानिक निरीक्षण अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२३ करीता संघ लोकसेवा आयोगाद्वारे काही विशिष्ट बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर प्रवेश हा प्रथम सत्राकरीता सकाळी ९.२० वाजेपर्यंत तर द्वितीय सत्राकरीता दुपारी २.२० वाजेपर्यंतच देण्यात येणार आहे. त्यानंतर कोणत्याही परीक्षार्थीस परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. तसेच परीक्षार्थ्यांना आयोगाने नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावरच परीक्षा देता येणार आहे. या बदलाबाबत परीक्षार्थीनी नोंद घेऊन त्यांना नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर व नियोजित वेळेतच उपस्थित राहतील याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्व परीक्षार्थींना केले आहे.
- ९.२० व २.२० नंतर प्रवेश नाही
परीक्षार्थींना प्राप्त झालेल्या परीक्षेच्या प्रवेश पत्रावरील माहिती काळजीपूर्वक वाचून सर्व सूचनांचे पालन परीक्षार्थीने काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर सकाळच्या सत्राकरीता सकाळी ९.२० नंतर व दुपारच्या सत्राकरीता दुपारी २ वाजून २० मिनिटांनंतर प्रवेश देण्यात येणार नसल्याने परीक्षार्थीने याबाबत स्वतःचे स्तरावर विशेष काळजी घेऊन आयोगाने दिलेले वेळेचे बंधन कटाक्षाने पाळावयाचे असल्याचे निर्देश दिलेले आहेत.
- मोबाईल-कॅलक्युलेटर बंदी
परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र, ओळखपत्र, काळा बॉल पॉईन्ट पेन तसेच आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्याव्यतिरिक्त इतर कोणतेही साहित्य म्हणजे कॅलक्युलेटर, मोबाईल फोन, डिजिटल वॉच, ब्लूटुथ, आय- पॅड, आय. टी. गॅजेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधने परीक्षा केंद्रामध्ये आत नेण्यास सक्त मनाई आहे.