शेतकऱ्यांना मिळेल का केंद्राचे बूस्ट ?
By Admin | Updated: June 4, 2017 01:47 IST2017-06-04T01:47:39+5:302017-06-04T01:47:39+5:30
किसान क्रांतीच्या झेंड्याखाली विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग शनिवारी रात्री नागपुरात दाखल झाले.

शेतकऱ्यांना मिळेल का केंद्राचे बूस्ट ?
संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री नागपुरात : आज शेतकरी मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : किसान क्रांतीच्या झेंड्याखाली विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग शनिवारी रात्री नागपुरात दाखल झाले. रविवारी विविध बैठका घेऊन ते दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. संपाच्या पार्श्वभूमीवर ते शेतकऱ्यांना दिलासा देणारी काही घोषणा करतील का, याकडे शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
किसान क्रांतीच्या झेंड्याखाली शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शुक्रवारी रात्री मुंबईत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा झाली. मात्र, दिवसभरातील घटनाक्रमात आंदोलकांमध्येच दोन गट पडल्याचे पहायला मिळाले. एका गटाने संप मागे घेणार नसून सुरूच ठेवणार असल्याची आक्रमक भूमिका घेतली. या संपाला विविध संघटना व राजकीय पक्षांचाही वाढता पाठिंबा मिळत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र होत असताना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग शनिवारी रात्री नागपुरात दाखल झाले.
रविवारी दुपारी १२.३० वाजता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या उद्घाटन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील.
दुपारी १ वाजता भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठाची संयुक्त बैठक रविभवन येथे होत आहे. या बैठकीला ते उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता देशपांडे सभागृहात शासकीय दूध योजना व राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाद्वारा संचालिक मदर डेअरीच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. येथेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा होईल. शेतकरी मेळावा होणार आहे. या सर्व बैठकांना व कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील. राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर हे देखील यावेळी उपस्थित राहतील.
हे सर्वच कार्यक्रम कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे या कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृषी क्षेत्राशी संबंधित काही घोषणा करतील, काही धोरणात्मक वक्तव्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.