उपराजधानीत सिमेंट रस्ते होणार
By Admin | Updated: April 26, 2015 02:28 IST2015-04-26T02:28:43+5:302015-04-26T02:28:43+5:30
उपराजधानीत सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. तब्बल ३०० कोटी रुपये खर्च करून महापालिका एकूण ६७.४३ किलोमीटर लांबीचे ५१ रस्ते सिमेंटचे करणार आहे.

उपराजधानीत सिमेंट रस्ते होणार
नागपूर : उपराजधानीत सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. तब्बल ३०० कोटी रुपये खर्च करून महापालिका एकूण ६७.४३ किलोमीटर लांबीचे ५१ रस्ते सिमेंटचे करणार आहे. २७ एप्रिल रोजी आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत सिमेंट रोडचे प्रस्ताव सादर केले जाणार असून त्यांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने सिमेंट रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. याशिवाय महापालिका व नासुप्रला आपापल्या वाट्याचे प्रत्येकी १०० कोटी रुपये द्यायचे आहेत. या संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी महापालिका करणार आहे. नासुप्रलाही आपल्या वाट्याची रक्कम महापालिकेकडे द्यावी लागेल. विशेष म्हणजे शहरात यापूर्वी एकात्मिक रहस्ते विकास योजना व क्रिप्स अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ९५ टक्के रस्त्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
प्रकल्पात १५ ते २४ मीटर रुंदीच्या प्रमुख रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात फक्त भावसार चौक ते तीन नल चौकापर्यंतचाच रस्ता ९ मीटरचा आहे. याची लांबी सुमारे ६०० मीटर आहे. डिसेंबर महिन्यात आयोजित हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी नवा फॉर्म्युला तयार केला होता.
यात राज्य सरकार, महापालिका व नासुप्रच्या संयुक्त विद्यमाने सिमेंटचे रस्ते तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
सुरुवातीला महापालिकेने या प्रकल्पात उत्सुकता दाखविली नाही. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना फटकारत सिमेंट रस्त्यांचा प्रस्ताव सादर करण्यासाठी डेडलाईन दिली. त्यानंतर घाईघाईत प्रस्ताव तयार करण्यात आला.
शेवटच्या क्षणी प्रस्तावात काही नव्या रस्त्यांचा समावेश करण्यात आला. राज्य सरकारने १०० कोटी रुपयेही जारी केले. आता प्रत्यक्षात काम कधी सुरू होईल याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)