कळमेश्वर-चौदा मैल मार्गावरील सेलू वळण धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:11 IST2021-08-26T04:11:38+5:302021-08-26T04:11:38+5:30

कळमेश्वर : कळमेश्वर- चौदा मैल मार्गावरील सेलू गावाजवळील वळण धोकादायक ठरत असून, विरुद्ध दिशेने येणारे वाहन दुचाकी चालकांना दिसत ...

Cellu turn on Kalmeshwar-fourteen mile road is dangerous | कळमेश्वर-चौदा मैल मार्गावरील सेलू वळण धोकादायक

कळमेश्वर-चौदा मैल मार्गावरील सेलू वळण धोकादायक

कळमेश्वर : कळमेश्वर- चौदा मैल मार्गावरील सेलू गावाजवळील वळण धोकादायक ठरत असून, विरुद्ध दिशेने येणारे वाहन दुचाकी चालकांना दिसत नसल्यामुळे या वळणावर अपघाताची मालिका सुरू झाली आहे. याबाबत सेलू गावातील गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हे वळण दुरुस्त करून सर्व्हिस रोडची मागणी केली आहे; परंतु प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्याने नाहक दुचाकी चालकांना बळी जावे लागत आहे.

तालुक्यातून जाणाऱ्या कळमेश्वर- चौदा मैल रोडवरील सेलू गावाजवळ असलेल्या वळणावर एका ट्रक चालकाने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना २३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान घडली. कळमेश्वर शहरातून चौदा मैलकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सेलू गावाजवळ धोकादायक वळण आहे. या वळणावरूनच सेलू गावात सरळ रस्ता जातो. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर भरधाव वाहने धावत असतात. दुचाकी चालक गावाकडे वळण घेताच मागून येणाऱ्या ट्रकचाा त्यांना अंदाज येत नाही, त्याचमुळे अनेक अपघात या ठिकाणी घडत आहेत. अशाच प्रकारे ही घटना घडली असून, मृतक नीळकंठ संतोष चामलाटे (६८), रा. सेलू हे प्रफुल दशरथ रंगारी याच्या दुचाकीवर कळमेश्वरकडून एमएच- ४० बीवाय- ७८४१ ने सेलू गावाकडे जात होते. दरम्यान, वळण घेत असताना मागून येणारा ट्रक क्रमांक सीजी- ०४ जेडी- २०२७ च्या चालकाने आपले वाहन भरधाव आणि निष्काळजीपणे चालवून दुचाकी चालकाला मागून धडक दिली. धडक बसताच दुचाकीवर मागे बसलेले नीळकंठ चामलाटे हे दूर फेकले गेले. गंभीर जखमी झाल्याने उपचारार्थ त्यांना ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे हलवले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले, तर दुचाकीचालक प्रफुल रंगारी हा गंभीर जखमी झाला.

तसेच बुधवारी दुपारी झालेल्या अपघातात सेलू येथीलच दोन युवक जखमी झाले आहेत. हा वळण मार्ग अजून किती बळी घेणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

---

कळमेश्वरकडून सेलूत जाण्यासाठी कळंबी जोड रस्त्यावरून ओव्हरब्रीजखालून मार्ग देण्यात आला आहे; परंतु तो एक किलोमीटरचा फेरा पडत असल्याने नागरिक या चौकातूनच सेलूकडे वळतात. विरुद्ध दिशेने किंवा मागून येणाऱ्या जड वाहनांमुळे अपघाताची शक्यता जास्त आहे. यामुळे या चौकाव्यतिरिक्त सेलू गावाजवळून वळण रस्ता द्यावा.

-प्रदीप चनकापुरे,

उपसरपंच, ग्रामपंचायत सेलू

---

कळमेश्वर-चौदा मैल चारपदरी मार्गावरून निमजीकडे जाण्यासाठी क्रॉसिंग रस्ता दिला नसल्याने तीन किलोमीटर समोर जाऊन लॉजिस्टिक पार्कजवळून निमजी गावाकडे वळावे लागते. यामुळे नागरिकांना सहा किलोमीटरचा फेरा घ्यावा लागतो. संबंधित विभागाने या समस्येकडे लक्ष द्यावे.

-नंदू राऊत, प्रशासक, ग्रामपंचायत निमजी

Web Title: Cellu turn on Kalmeshwar-fourteen mile road is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.