सीसीटीव्ही फुटेज विश्वासार्ह नाही
By Admin | Updated: April 29, 2016 03:02 IST2016-04-29T03:02:04+5:302016-04-29T03:02:04+5:30
युग चांडक हत्याकांड प्रकरणात सादर करण्यात आलेले सीसीटीव्ही फूटेज विश्वासार्ह नाही, असा दावा आरोपी राजेश धनालाल दवारेचे वकील मीर नगमान अली यांनी ..

सीसीटीव्ही फुटेज विश्वासार्ह नाही
आरोपीच्या वकिलाचा दावा : युग चांडक हत्याकांड प्रकरण
नागपूर : युग चांडक हत्याकांड प्रकरणात सादर करण्यात आलेले सीसीटीव्ही फूटेज विश्वासार्ह नाही, असा दावा आरोपी राजेश धनालाल दवारेचे वकील मीर नगमान अली यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केला.
या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी होत आहे. आरोपीची ओळखपरेड संशयास्पद आहे. ओळखपरेड घेताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले नाही. युगला अपहरण करताना पाहणारे अरुण मेश्राम, बिहारीलाल छाबडिया व राजन तिवारी हे तीन साक्षीदार जाणीवपूर्वक तयार करण्यात आले आहेत. अपहरणकर्ते चेहऱ्याला रुमाल बांधून होते. यामुळे त्यांना ओळखणे कठीण होते. अपहरणाच्या वेळेमध्ये तफावत आहे असेही अली यांनी न्यायालयाला सांगितले. ते उर्वरित युक्तिवाद उद्या, शुक्रवारी करतील.
अरविंद अभिलाष सिंग (२४) हा प्रकरणातील दुसरा आरोपी आहे. सत्र न्यायालयाने ४ फेब्रुवारी २०१६ रोजी दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३६४ -अ (खंडणीसाठी अपहरण)अंतर्गत मरेपर्यंत फाशी, कलम ३०२ (हत्या)अंतर्गत मरेपर्यंत फाशी व कलम २०१ (पुरावे नष्ट करणे)अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली आहे.
फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी हे प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ३६६ अनुसार उच्च न्यायालयात सादर करण्यात आले आहे. तसेच दोन्ही आरोपींनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले आहे. ही घटना १ सप्टेंबर २०१४ रोजी घडली होती. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे, तर फिर्यादीतर्फे अॅड. राजेंद्र डागा यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)