मेडिकलच्या ६० टक्के भागावर सीसीटीव्हीची नजर

By Admin | Updated: June 11, 2016 03:22 IST2016-06-11T03:22:23+5:302016-06-11T03:22:23+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था कालपर्यंत केवळ आठ-दहा सीसीटीव्हीवर होती.

CCTV eye on 60 percent of the medical | मेडिकलच्या ६० टक्के भागावर सीसीटीव्हीची नजर

मेडिकलच्या ६० टक्के भागावर सीसीटीव्हीची नजर

सुरक्षा व्यवस्था होणार चोख : वॉकी-टॉकीही येणार
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था कालपर्यंत केवळ आठ-दहा सीसीटीव्हीवर होती. आता यात वाढ करून ४० सीसीटीव्ही लावण्याचे कार्य अंतिम टप्प्यात आहे. मेडिकलच्या ६० टक्के भागावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. या शिवाय सुरक्षा रक्षकांच्या हाती लवकरच वॉकी-टॉकीही येणार आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणारे वारंवार हल्ले, नवजात शिशूची चोरी, महिलांना अपमानास्पद वागणूक या सर्वांवर लक्ष्य ठेवण्यासाठी २०१३ मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) केवळ आठ सीसीटीव्ही कॅमेरे दिले होते. त्याच्या भरवशावर मेडिकलची सुरक्षा कशीबशी सुरू होती.
परंतु त्यानंतरही गेल्या दोन वर्षांत या संबंधिच्या घटना वाढल्या. मात्र अनेक ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने घटना नजरेस पडत नव्हत्या. याची दखल स्वत: अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी घेतली. त्यांनी या संदर्भातील नव्याने प्रस्ताव डीएमईआरकडे पाठवून पाठपुरावा केला. विशेष म्हणजे, डॉक्टरांची निवासी संघटना ‘मार्ड’ने हा विषय ताणून धरला होता.
अखेर डीएमईआरने मेडिकलला ४० सीसीटीव्हीला मंजुरी दिली. सध्या हे कॅमेरे दोन्ही अपघात विभागासह, सर्व शस्त्रक्रिया कक्षाच्या बाहेर, लहान मुलांचे अतिदक्षता विभाग, निवासी डॉक्टरांच्या ठिकाणी, प्रसूती कक्ष, अतिदक्षता विभाग व रुग्णांच्या नातेवाईकांच्या गर्दीच्या ठिकाणी लावण्याचे काम सुरू आहे.
मेडिकलच्या साधारण ६० टक्के भागावर कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. याचे फुटेज बघण्याची व्यवस्था सुरक्षा रक्षकांचा कक्ष आणि अधिष्ठाता कार्यालयात असणार आहे. (प्रतिनिधी)

सुरक्षा रक्षकांच्या हातात वॉकी-टॉकी
मेडिकलमधील महत्त्वाच्या पाच ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या हातात आता वॉकी-टॉकी असणार आहे. कुठे काही गडबड झाली याची माहिती वॉकी-टॉकीवरून देऊन गैरप्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न असणार आहे.

Web Title: CCTV eye on 60 percent of the medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.