लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेच्यानागपूर विभागातील १७ रेल्वे स्थानकांवरील १८ फूट ओव्हर ब्रिज (एफओबी)वर उच्च-गुणवत्तेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रेल्वे गाड्यांच्या पेंटोग्राफ आणि ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई)वर सलग आणि थेट नजर ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जात आहे.
ओव्हरहेड इक्विपमेंटमध्ये निर्माण होणाऱ्या संभाव्य दोषांचे तातडीने निदान करणे जिकरीचे ठरते. त्याचा प्रतिकूल परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होतो. त्यामुळे तातडीने काय करता येईल, यावर रेल्वे प्रशसानातील शीर्षस्थांमध्ये बराच खल झाला होता. त्यातून लोको, इएमयू आणि मेमू गाड्यांच्या पेंटोग्राफचे सातत्याने ऑनलाइन निरीक्षण करण्यासाठी संबंधित वरिष्ठांनी ही अभिनव कल्पना मांडली. त्यावर बराच विचार विमर्श झाल्यानंतर ही योजना राबविण्याचे ठरले आणि अखेर त्याला मूर्त स्वरूप मिळाले.
त्यानुसार, नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक एक आणि आठवरच्या दोन एफबीओवर प्रत्येकी दोन, तर अजनी, बल्लारशाह, परासियासह अन्य रेल्वे स्थानकांवरच्या प्रत्येक एफओबीवर २ याप्रमाणे एकूण ३६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
प्रत्येक कॅमेऱ्याची मांडणी (लावणी) अशा पद्धतीने करण्यात आली की, त्या एफओबीवरून थेट ट्रॅक्शन सिस्टीमवर लक्ष ठेवले जाते. यामुळे पेंटोग्राफ किंवा संबंधित ओएचईमधील दोष, त्रुटी तत्काळ लक्षात येतात. परिणामी रेल्वेच्या संचालनात येऊ पाहणारे संभाव्य अडथळे टाळता येतात.
...या स्थानकांवर लागले कॅमेरे
नागपूर, अजनी, खापरी, बुटीबोरी, सेवाग्राम, वर्धा, धामणगाव, वरोरा, चंद्रपूर, बल्लारशाह, काटोल तसेच गोराडोंगरी, बैतूल, आमला, मुलताई, परासिया आणि पांढुर्णा रेल्वे स्थानकांवरील एफबीओवर हे स्मार्ट वॉचर लावण्यात आले आहेत. रिअल टाइम निरीक्षण ही यंत्रणा लोकोमोटिव्ह, इएमयू आणि मेमू गाड्यांच्या पेंटोग्राफचे रिअल - टाइम निरीक्षण करते. त्यामुळे संभाव्य तांत्रिक बिघाडाचे संकेत लक्षात येतात. परिणामी बिघाड होण्यापूर्वीच त्याची दुरूस्ती करून सुरक्षित तसेच अखंड सेवा देणे शक्य होते.
रेल्वेची स्मार्ट प्रणालीरेल्वेच्या आधुनिकीकरणातील स्मार्ट प्रणाली म्हणून या यंत्रणेकडे बघितले जाते. कारण कॅमेऱ्याकडून मिळणारी रिल (चित्रफीत)वर ट्रॅक्शन पॉवर कंट्रोल (टीपीसी) टीमकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येते. त्यामुळे बिघाडाचा कोणताही संकेत दिसताच त्वरित कृती केली जाते आणि पुढे येऊ पाहणारा अडथळा आधीच दूर करण्यात यश येते.