सीसीटीव्ही कॅमेरे ठरत आहेत शाेभेची वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST2021-06-09T04:10:32+5:302021-06-09T04:10:32+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : शहरात गेल्या काही वर्षांत भुरट्या चाेरट्यांचा वाढलेला धुमाकूळ पाहता, शहरातील सीमावर्ती भाग व वर्दळीच्या ...

CCTV cameras are becoming a thing of the past | सीसीटीव्ही कॅमेरे ठरत आहेत शाेभेची वस्तू

सीसीटीव्ही कॅमेरे ठरत आहेत शाेभेची वस्तू

लाेकमत न्यूज नेटवर्क

माैदा : शहरात गेल्या काही वर्षांत भुरट्या चाेरट्यांचा वाढलेला धुमाकूळ पाहता, शहरातील सीमावर्ती भाग व वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. यामुळे शहराच्या हद्दीत हाेणाऱ्या घरफाेडी, वाहनचाेरी, अवैध रेती वाहतूक व इतर अवैध धंद्यांना आळा बसला हाेता, परंतु सद्यस्थितीत शहरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद स्थितीत असून, ते शाेभेचीच वस्तू ठरत आहेत. त्यामुळे चाेरीच्या घटनांवर अंकुश लावणार तरी कसा, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

शहरातील प्रमुख वर्दळीच्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. यामुळे अवैध रेती वाहतुकीला उधाण आले आहे. भंडाऱ्याकडून हाेणारी रेतीची ओव्हरलाेड वाहतूक, चिकना घाटातून रात्रंदिवस धावणारे रेतीचे टॅक्टर व टिप्पर यांना सध्या सुगीचे दिवस आले आहे. या अवैध रेती वाहतुकीवर कारवाई हाेत नाही. त्यामुळे या अवैध धंद्यांना चालना देण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले तर नसावे, अशी चर्चा नागरिकांत केली जात आहे.

एखाद्या चाेरीच्या घटनेत चाेरटा काेणत्या दिशेने पळाला, गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांचे क्रमांक, आराेपीचा पेहराव, अपघात वा घटनेतील घडामाेडीबाबत पाेलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत मिळते, शिवाय शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पाेलिसांचा ‘वाॅच’ हाेता. मात्र, आता हे कॅमेरेच बंद असून, ते केवळ शाेभेची वस्तू ठरत आहेत.

....

तांत्रिक अडचणीमुळे सीसीटीव्ही बंद

या संदर्भात पाेलीस ठाण्यात संपर्क साधला असता, गेल्या सात-आठ महिन्यांपासून काही तांत्रिक अडचणींमुळे शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाकडे असल्याचे स्टेशन डायरीवर असलेल्या पाेलीस कर्मचाऱ्याने सांगितले. दुसरीकडे, नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी राजेशसिंह परमार यांना सीसीटीव्हीबाबत विचारले असता, सीसीटीव्ही कॅमेरे आमच्या देखरेखीत येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: CCTV cameras are becoming a thing of the past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.