सीबीएसई बोर्डाप्रमाणे राज्य मंडळाने दहावीची परीक्षा रद्द करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:07 IST2021-04-21T04:07:48+5:302021-04-21T04:07:48+5:30
नागपूर : मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांनी दहावी सीबीएसई बोर्डाच्या निर्णयाप्रमाणे राज्य मंडळाची दहावी बोर्डाची परीक्षा कोणताही दुजाभाव न करता ...

सीबीएसई बोर्डाप्रमाणे राज्य मंडळाने दहावीची परीक्षा रद्द करावी
नागपूर : मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांनी दहावी सीबीएसई बोर्डाच्या निर्णयाप्रमाणे राज्य मंडळाची दहावी बोर्डाची परीक्षा कोणताही दुजाभाव न करता रद्द करावी, अशी मागणी शिक्षक, संस्थाचालक व पालकांच्या संघटनांकडून होत आहे.
सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेतला. मात्र, राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियावर जून महिन्यात परीक्षा होईल, असे घोषित केले. त्यामुळे हा निर्णय विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा व त्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आणणारा असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
दहावीनंतर अकरावीत प्रवेश घेणे, नीट, जेईई, क्लासेस लावणे, परीक्षा, इतर सर्व नियोजन सदर घोषणेने बिघडल्याने पालक नाराज आहेत. कारण जून महिन्यात परीक्षा होईल की नाही, हे सुद्धा कोरोना लाटेमुळे सांगता येत नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक नियोजन करणे शक्य नाही.
- सध्याची परिस्थिती राज्यात फारच चिंताजनक आहे व प्रत्येक पालक चिंतेत आहे. लाखो परिवार कोरोना संक्रमनाने ग्रस्त आहेत, कित्येक परिवारातील जीव गेलेले आहेत, विद्यार्थी अनाथ झालेले आहेत, अशा परिस्थितीत खरंच विद्यार्थी परीक्षा देतील काय, तसेच केंद्र मंडळ परीक्षा घेणार नाही व राज्य मंडळ परीक्षा घेणार, हा एकाच वर्गातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
प्रा. सचिन काळबांडे, अध्यक्ष, आरटीई फाउंडेशन
- दहावी व बारावी परीक्षेवर कोरोना संक्रमण खाजगी शाळा व शिक्षक यांच्या आर्थिक अडचणीमुळे ते शाळेत येण्यास तयार नाहीत. परीक्षेच्या नियोजनात अडचण येणार आहे.
राम वंजारी, संस्थाचालक
- शिक्षणमंत्र्यांनी तातडीने याचा विचार करून सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे परीक्षा रद्द करून दहाव्या वर्गालाही इतर वर्गाप्रमाणे प्रमोट करावे.
अर्चना ढबाले, संचालक
- शिक्षणमंत्री म्हणतात जूनमध्ये परीक्षा होईल; पण राज्याची परिस्थिती लक्षात घेता शक्य आहे का, विद्यार्थ्यांच्या िजिवाशी खेळ करण्यापेक्षा सरसकट परीक्षा रद्द करावी. उगाच पालक व विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढविण्यात काही अर्थ नाही.
विनोद बांगडे, पालक
- यावर्षी अनेक शाळांमध्ये सत्रच झाले नाही. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांनी पुस्तकेच उघडले नाही. शहरातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले, पण सर्वच विद्यार्थ्यांच्या पचनी पडले नाही. सरकारने परीक्षा घेऊन ग्रामीण, शहरीमध्ये दुजाभाव करण्यापेक्षा सर्वसमावेशक निर्णय घ्यावा.
राजेंद्र अतकर, शिक्षक