आयकर आयुक्तांकडे सीबीआयची धाड
By Admin | Updated: May 30, 2015 02:54 IST2015-05-30T02:54:53+5:302015-05-30T02:54:53+5:30
मुंबईच्या सीबीआय पथकाने सेमिनरी हिल्स सीपीडब्ल्यूडी क्वॉर्टर येथील एका आयकर आयुक्ताचे (अपील) शासकीय निवासस्थान त्यांच्या अनुपस्थितीत सील केल्याची माहिती आहे.

आयकर आयुक्तांकडे सीबीआयची धाड
सीबीआयने निवासस्थान केले सील : मुंबई पथकाची कारवाई
नागपूर : मुंबईच्या सीबीआय पथकाने सेमिनरी हिल्स सीपीडब्ल्यूडी क्वॉर्टर येथील एका आयकर आयुक्ताचे (अपील) शासकीय निवासस्थान त्यांच्या अनुपस्थितीत सील केल्याची माहिती आहे. ते अभ्यास रजा घेऊन लंडन येथे गेल्याचे कळते.
सीबीआयच्या नागपूर कार्यालयाने अशी कोणती कारवाई केल्याचा इन्कार केला आहे. मात्र अशी कारवाई झाल्याचे आयकर विभागाच्या विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
सदर आयकर आयुक्तांची गत वर्षीच मुंबईहून नागपुरात बदली करण्यात आली. ते सीपीडब्ल्यूडी क्वॉर्टर येथे एकटेच राहतात. त्यांनी आपले कुटुंब आणलेले नाही.
मुंबई येथे एका जुन्या आयकर अपील प्रकरणात त्यांनी अपीलकर्त्याच्या बाजूने काम केल्यामुळे सीबीआयने त्यांची चौकशी प्रारंभ केली. चौकशी दरम्यान त्यांची नागपुरात बदली करण्यात आली, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच चार जणांचे मुंबई सीबीआयचे पथक नागपुरात आले. त्यांच्या निवासस्थानाची झडती घेऊन जप्ती करण्याच्या हेतूने हे पथक सीपीडब्ल्यूडी क्वॉर्टर येथे धडकले होते. परंतु ते लंडन येथे गेल्याचे समजताच त्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानाला सील ठोकले. लागलीच हे पथक मुंबईकडे रवाना झाले, असेही या सूत्रांकडून सांगण्यात आले.