सीबीआयने पुन्हा उघडली विदर्भातील व्याघ्र शिकारप्रकरणाची फाईल
By Admin | Updated: June 4, 2017 16:58 IST2017-06-04T16:58:17+5:302017-06-04T16:58:17+5:30
विदर्भात सन २०१३ ते २०१६ या काळात १० ते १२ वाघांची शिकार झाल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण गुन्हे शाखेने (सीबीआय) पुन्हा तपासाची फाईल उघडली आहे.

सीबीआयने पुन्हा उघडली विदर्भातील व्याघ्र शिकारप्रकरणाची फाईल
गणेश वासनिक ।
अमरावती : विदर्भात सन २०१३ ते २०१६ या काळात १० ते १२ वाघांची शिकार झाल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण गुन्हे शाखेने (सीबीआय) पुन्हा तपासाची फाईल उघडली आहे. मेळघाटच्या मसुंडी येथे दोन वाघांच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींचे बयाण चिखलदरा तहसीलदारांसमक्ष नोंदविले आहे. त्यामुळे वाघ शिकारप्रकरणी नेमके काय दडले आहे, हे अद्यापही कळू शकले नाही.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार वाघ शिकारप्रकरणाचा छडा लावण्यासाठी १५ एप्रिल ते १० मे २०१७ यादरम्यान सीबीआयची पाच जणांची चमू विदर्भात तळ ठोकून होती. ताडोबा, पेंच, यवतमाळचे टीपेश्वर, मेळघाटातील जारिदा, घटांग, अकोट तर नवेगाव बांध, नागझिरा येथील गोंदिया, चंद्रपूर, भंडारा व नागपूर या भागात वाघाची शिकार झाल्याचे स्पष्ट झाले होते. विदर्भात तीन वर्षांत एकूण १० ते १२ वाघांची शिकार झाल्याप्रकरणी राज्य सरकारने पुढाकार घेत तपास सीबीआयकडे सोपविला होता. त्यानुसार वाघ शिकारप्रकरणी वनाधिकारी, पोलिसांनी काही आरोपींना अटक करून न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात रवानगी केली होती. मात्र, विदर्भातील व्याघ्र शिकारींचे कनेक्शन राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर तर जुळलेले नाहीत ना, याचा मुळाशी पोलीस, वनविभाग पोहोचू शकला नाही. दरम्यान वाघ शिकारीच्या तपासाची सूत्रे सीबीआयकडे येताच त्याअनुषंगाने तपास सुरु झाला. विदर्भात वाघांच्या शिकारीमागे मध्यप्रदेशातील बहेलिया टोळीचा हात असून या टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याच्या निष्कर्षाप्रत सीबीआय पोहोचली होती.
परंतु यापूर्वी पोलीस, वनविभागाने वाघ शिकारप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या बयाणात तफावत असल्याने सीबीआयला तपासामध्ये अनेक अडचणी आल्यात. सीबीआयने तीन टप्प्यात वाघ शिकारींचा तपास चालविला. मात्र, अटकेतील आरोपींनी वाघांच्या हत्यमागे आंतरराष्ट्रीय प्रमुख सूत्रधार कोण? याचा थांगपत्ता लागू दिला नाही. परिणामी केंद्र सरकारने सीबीआयला विदर्भातील वाघांच्या शिकारप्रकरणी पुन्हा फाईल उघडण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी दिल्ली येथील सीबीआयची पाच जणांची चमू चिखलदरा येथे येऊन गेली. मेळघाटातील मसुंंडी येथील दोन वाघांच्या शिकारप्रकरणी अटकेतील तीन आरोपींचे चिखलदरा तहसीलदारांसमक्ष बयाण नोंदविले आहे. यातिन्ही आरोपींना बयाणासाठी सीबीआयने नागपूर मध्यवर्ती कारागृहातून आणले होते, हे विशेष. विदर्भातील एकूण वाघ हत्येप्रकरणी अटकेतील आरोपींचे नव्याने बयाण नोंदवून सीबीआयने वेगळ्या दिशेने तपासाची चक्रे सुरू केली आहेत.
वाघ शिकारप्रकरणी मुख्य सूत्रधाराचा सीबीआय घेणार शोध
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार विदर्भातील वाघ शिकारींच्या मागे आंतरराष्ट्रीय सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी सीबीआयने पुन्हा तपासासाठी फाईल उघडली आहे. वाघ शिकारप्रकरणी अटक केलेल्या आरोपींचे बयाण नोंदविले जात आहे. वाघांच्या शिकारप्रकरणी मध्यप्रदेशातील बहेलिया टोळी असली तरी याटोळीला आंतरराष्ट्रीय स्तरावरून रसद कोण पुरविते, या मुळाशी सीबीआयला जायचे असल्याने आरोपींचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
वाघांच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना सीबीआयची चमू घेऊन आली होती. त्यापैकी एका आरोपीची ओळखपरेड घेण्यात आली. याआरोपीला एका स्थानिक शेतकऱ्याने ओळखले. दोषारोपपत्रात नमूद आरोपी तेच असल्याबाबत ‘क्रॉसचेकिंग’ करण्यात आले.
- सैफन नदाफ
तहसीलदार, चिखलदरा