दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रावर सीबीआयचा छापा

By Admin | Updated: May 19, 2015 01:45 IST2015-05-19T01:45:55+5:302015-05-19T01:45:55+5:30

गैरप्रकारांच्या अनेक तक्रारींमुळे वादग्रस्त ठरलेल्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या कार्यालयात सोमवारी सीबीआयने

CBI raid on South Central Cultural Center | दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रावर सीबीआयचा छापा

दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रावर सीबीआयचा छापा

नागपूर : गैरप्रकारांच्या अनेक तक्रारींमुळे वादग्रस्त ठरलेल्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या कार्यालयात सोमवारी सीबीआयने छापा घातला. तब्बल सहा तास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी येथे चौकशी केली. कार्यालयातील अनेक फाईल्स तसेच महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतानाच अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बयाणही नोंदवून घेतले.

दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचा कारभार गेल्या दोन वर्षांपासून कमालीचा वादग्रस्त बनला होता. येथे काही अप्रतिम कलाकृती (पेंटिंग) होत्या. विदेशात त्या विकल्या तर चांगला फायदा होऊ शकतो, म्हणून यापूर्वीचे संचालक रवींद्र सिंघल यांनी तसा प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. मात्र, लालफितशाहीमुळे त्याला मंजुरी मिळाली नाही.
दरम्यान, सिंघल यांची बदली झाली. नवे संचालक म्हणून पीयूषकुमार यांनी पदभार सांभाळला. त्यानंतर हे पेंटिंग्स रहस्यमयरीत्या गायब झाल्याची चर्चा होती. तशा तक्रारीही वरिष्ठ पातळीवर झाल्या होत्या. त्यासोबतच विविध कार्यक्रम, कार्यालयीन खर्च आणि कलावंतांचे मानधन यासंबंधाने ‘उदार आर्थिक धोरण’ राबविले जात असल्याच्या तक्रारी झाल्या. वरिष्ठ पातळीवरून त्याची शहानिशा करण्यात आली. मात्र, समाधानकारक माहिती पुढे आली नाही. त्यामुळे सीबीआयकडे तक्रार करण्यात आली. सीबीआयचे अधीक्षक संदीप तामगाडगे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून या तक्रारीची आपल्या चमूकडून सूक्ष्म चौकशी करवून घेतली. तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे सोमवारी दुपारी सीबीआयचे पथक दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात धडकले. अधिकाऱ्यांचे कार्यालय, कक्ष, तसेच कर्मचाऱ्यांच्या समोर त्यांनी विविध कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेतली. त्यासोबतच काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली. अनेकांचे बयाण नोंदविण्यात आले. तब्बल ६ ते ७ वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती. या दरम्यान, सीबीआयचे अधीक्षक संदीप तामगाडगे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचे मोबाईल स्वीच्ड आॅफ असल्यामुळे चौकशीत नेमके काय हाती लागले ते स्पष्ट होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)

प्रशासनात खळबळ
४दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रावर सीबीआयने छापा घातल्याच्या वृत्तामुळे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली. या केंद्राकडे अनेकांनी धाव घेत काय झाले ते जाणून घेण्याचे प्रयत्न केले. लोकमत प्रतिनिधीने दमसां केंद्राचे संचालक पीयूषकुमार यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांनी आता याबाबत काही बोलणार नाही, असे सांगून झालेल्या प्रकाराबाबत माहिती देण्याचे टाळले.

Web Title: CBI raid on South Central Cultural Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.