एचपीसीएल कार्यालयात सीबीआयची तपासणी
By Admin | Updated: July 16, 2014 01:18 IST2014-07-16T01:18:15+5:302014-07-16T01:18:15+5:30
भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून हिंदुस्थान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) च्या प्रादेशिक कार्यालयात आज सीबीआयच्या पथकाने प्रदीर्घ तपासणी आणि चौकशी केली. या चौकशीतून सीबीआयच्या

एचपीसीएल कार्यालयात सीबीआयची तपासणी
नागपूर : भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून हिंदुस्थान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) च्या प्रादेशिक कार्यालयात आज सीबीआयच्या पथकाने प्रदीर्घ तपासणी आणि चौकशी केली. या चौकशीतून सीबीआयच्या हाती नेमके काय लागले, ते मात्र रात्रीपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. एचपीसीएलच्या भ्रष्टाचाराच्या सीबीआयकडे अनेक तक्रारी होत्या. त्याची शहानिशा केल्यानंतर सीबीआयच्या स्थानिक युनिटने सीबीआय मुख्यालयातून चौकशीची परवानगी मिळवली. त्यानंतर आज सकाळी सीबीआयचे अधीक्षक संदीप तामगाडगे यांच्या नेतृत्वात सीबीआयच्या पथकाने कस्तुरचंद पार्कजवळच्या (एलआयसी चौकानजिक) एचपीसीएलच्या प्रादेशिक कार्यालयात धडक दिली.
सकाळपासून तपासणी पथकाने कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली. तपासणीनंतर सीबीआच्या पथकाने काही कागदपत्रे ताब्यात घेतली आणि एचपीसीएलच्या काही अधिकाऱ्यांची जबानीही नोंदविल्याची माहिती आहे.
चौकशीदरम्यान सीबीआयच्या पथकासोबतच एचपीसीएलचे सतर्कता पथकही असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, त्याला दुजोरा मिळू शकला नाही.
विस्तृत माहितीसाठी एचपीसीएलच्या कार्यालयात तेथील भारद्वाज नामक अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष, तसेच टी. राजेश यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी बोलण्याचे टाळले. त्यामुळे नेमकी काय अन कशासाठी चौकशी झाली, ते स्पष्ट झाले नाही.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. मात्र, चौकशी सुरू आहे, त्यामुळे जास्त काही बोलणे योग्य नाही, असे सांगितले. (प्रतिनिधी)